esakal | ग्लोबल मराठी आंत्रप्रेन्युअर अॅवॉर्ड

बोलून बातमी शोधा

ग्लोबल मराठी आंत्रप्रेन्युअर अॅवॉर्ड
ग्लोबल मराठी आंत्रप्रेन्युअर अॅवॉर्ड
sakal_logo
By
रविंद्र गाडगीळ (मिल्टन कीन्स)

लंडन मराठी संमेलन २०१७ (LMS 2017) हे सर्व दूर पसरलेल्या महाराष्ट्रीयांना एकत्र आणण्याचा एक मोठ्ठा पुढाकार आहे. महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन वर्षाच्या निमित्ताने साजरा होणारा लंडन मराठी संमेलन हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि मराठी बाण्याचा एक अद्भुत आविष्कार असणार आहे.

पहिले जागतिक मराठी उद्योजकांचे अधिवेशन हे ३ जून ला होणार आहे. दुबई, अमेरिका, UK, भारत आणि इतर देशातून अधिवेशनासाठी उद्योजक येतील. ३ आणि ४ जून ला एक मोठा सांस्कृतिक सोहळा आयोजित केला आहे, ज्यामध्ये युके, यूरोप आणि इतर देशातून जवळ जवळ १३०० नागरिक अपेक्षित आहेत.

उद्योजक म्हंटले की, जोखीम पत्करून आपल्यात असलेल्या आत्मविश्वासाने, कठीण परिश्रमाने आणि स्वबळावर एक विश्वच निर्माण करतात. विश्वस्तरावरील वेग वेगळ्या उद्योगात जम बसविलेल्या महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. UK मधील उद्योजकांना वाव मिळावा, मदत व्हावी, प्रोत्साहन मिळावे, उद्योग वाढविण्यासाठी संधी मिळाव्यात म्हणून १० एप्रिल २०१६ ला Overseas Maharashtrians Professionals and Entrepreneurs Group (OMPEG) नावाच्या संस्थेची मुहूर्तमेढ झाली. हि स्पर्धा OMPEG आणि LMS या संस्था मिळून घेत आहेत.

यानिमित्त ‘ग्लोबल मराठी आंत्रप्रेन्युअर अॅवॉर्ड’चे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी जगभरातील मराठी उद्योजकांकडून नामांकने मागविण्यात आली आहेत. या नामांकनांसाठीची मुदत लोकआग्रहास्तव ११ मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.

‘ग्लोबल मराठी आंत्रप्रेन्युर अॅवॉर्ड’ हा ‘स्टार्ट-अप बिझनेसेस’ आणि ‘मॅच्युअर बिझनेसेस’ अशा दोन गटांत देण्यात येणार आहे. यानुसार नामांकनांसाठी इच्छुक उद्योजकांचे पालक महाराष्ट्रीय असणे अथवा जन्मठिकाण महाराष्ट्र असणे आवश्यक आहे. जे उद्योजक २० वर्षे महाराष्ट्रात स्थायिक आहेत व त्यांचा उद्योग-व्यवसाय महाराष्ट्रात सुरू आहे, त्यांनाही महाराष्ट्रीय मानण्यात येईल, असे आयोजकांनी म्हटले आहे. याशिवाय या उद्योजकांचा व्यवसाय हा १ एप्रिल २०१४ पासून सुरू झालेला असावा व किमान पाच पूर्णवेळ कर्मचारी त्यांच्याकडे सातत्याने नोकरीस असावेत, अशीही अट या पुरस्कारांसाठी आहे. ‘स्टार्ट-अप बिझनेसेस’ या पुरस्कारासाठी अर्जदाराने १ नोव्हेंबर २०१६पर्यंत किमान तीन वर्षे व्यवसाय केला असणे गरजेचे आहे, तर ‘मॅच्युअर बिझनेसेस’ या पुरस्काराच्या नामांकनासाठी अर्जदाराने १ नोव्हेंबर २०१६ पर्यंत किमान १० वर्षे व्यवसायात असणे आवश्यक आहे. या दोन्ही पुरस्कारांसाठी द्वितीय क्रमांकांची तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. दोन्ही गटांतील विजेत्यांना प्रत्येकी तीन हजार पौंड रोख, लंडन सफारी तसेच सन्मानचिन्ह देण्यात येईल, तर उपविजेत्यांना प्रत्येकी दोन हजार पौंड रोख, लंडन सफारी व सन्मानचिन्ह असे पारितोषिक आहे.

स्पर्धेतील सहभाग:
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाच हजार रुपये शुल्क असून, ते विहित नमुन्यातील अर्जासह ११ मार्च पर्यंत देणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नामांकन अर्ज खालील लिंकवर मिळेल:
http://www.ompeg.org.uk/ompeg-global-awards-2017/