esakal | फ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाचा दहावा गणेशोत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Mandal in France

माधुरीताईंच्या कथा कथन कार्यक्रमानंतर, श्री. सुधीर गाडगीळ यांनी 'मुलुखावेगळी माणसे' हा कार्यक्रम सादर केला. तीस वर्षांहून अधिक काळ, भारतातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेताना, या मान्यवरांचे सुधीरजींना दिसलेले विविध पैलू अत्यंत मिश्किल शब्दात सुधीरजींनी सादर केले. इंदिरा गांधी यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावाचे वेगळेच कंगोरे उलगडून दाखवले. निरीक्षण, वाचन, सराव या बरोबरच प्रसंगावधान याचे सूत्रसंचालनात महत्व आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. दोन तास सर्व रसिक त्यांच्या अनुभव कथनात रमून गेले. 

फ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाचा दहावा गणेशोत्सव

sakal_logo
By
प्रियांका देवी मारुलकर

महाराष्ट्र मंडळ फ्रान्सने या वर्षी आपला दहावा गणेशोत्सव साजरा दणक्यात साजरा केला. विशेष म्हणजे या वर्षी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि लेखिका माधुरी शानभाग महाराष्ट्र मंडळाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ज्ञानदेवतेच्या पूजेसाठी शब्दांची आराधना करणारे पाहुणे लाभणे म्हणजे दुग्धशर्करा योग होता.

उन्हाळी सुट्टीनंतर होणाऱ्या या कार्यक्रमास पॅरीस मधल्या मराठी मंडळींनी उत्साहात उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या आरतीने झाली. त्यानंतर मंडळाच्या सर्व सभासदांनी एक साथ अथर्वशीर्ष पठण केले. लहान मुलांनी उत्साहात "गणपती बाप्पा मोरया" चा गजर केला. प्रसाद आणि सहभोजनाचा आस्वाद घेतल्यावर कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम, श्रीमती माधुरी शानभाग यांनी मंडळातील छोट्या मित्रमैत्रिणीसाठी दोन कथा सांगितल्या. माधुरी ताईंनी "गांधीजींची तीन माकडे" आणि "तहानलेला कावळा" या दोन गोष्टी सांगितल्या. सर्व मराठी भाषिकांना बऱ्याच वर्षांपासून परिचयाच्या असलेल्या या गोष्टी आजच्या लहान मुलांना पटतील आणि त्यातून आजच्या काळास सुसंगत असा बोध घेता येईल या प्रकारे अत्यंत रंगवून सांगितल्या.

माधुरीताईंच्या कथा कथन कार्यक्रमानंतर, श्री. सुधीर गाडगीळ यांनी 'मुलुखावेगळी माणसे' हा कार्यक्रम सादर केला. तीस वर्षांहून अधिक काळ, भारतातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेताना, या मान्यवरांचे सुधीरजींना दिसलेले विविध पैलू अत्यंत मिश्किल शब्दात सुधीरजींनी सादर केले. इंदिरा गांधी यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावाचे वेगळेच कंगोरे उलगडून दाखवले. निरीक्षण, वाचन, सराव या बरोबरच प्रसंगावधान याचे सूत्रसंचालनात महत्व आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. दोन तास सर्व रसिक त्यांच्या अनुभव कथनात रमून गेले. 

शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या ! 
हवा तेव्हा, हवा तिथे, निःशब्दाला मान द्या !

या समर्पक शब्दात आपल्या यशस्वी सूत्रसंचालन कारकिर्दीविषयी सांगून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान करायला महाराष्ट्र मंडळ फ्रान्सचे अध्यक्ष शशी धर्माधिकारी आणि सेक्रेटरी आशा राजगुरू उपस्थित होते.