esakal | 'पैलतीर'मध्ये सहभागी होऊ या!

बोलून बातमी शोधा

'पैलतीर'मध्ये सहभागी होऊ या
'पैलतीर'मध्ये सहभागी होऊ या!
sakal_logo
By
संतोष धायबर

ई-सकाळ आणि परदेशातील मराठी वाचकांचे नाते 26 जानेवारी 2000 पासून ते अगदी या क्षणापर्यंत. "ई सकाळ'वरील पैलतीर दालनाच्या माध्यमातून अनेक वाचक लिहिते झाले. 'ई सकाळ' आणि परदेशस्थ वाचकांचे नाते दिवसेंदिवस घट्ट झाले.

मराठी वाचकांची गरज लक्षात घेऊन व तंत्रज्ञानात नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या 'सकाळ'ने 26 जानेवारी 2000 मध्ये 'ई सकाळ' वेबसाईट सुरू केली. 'ई सकाळ'च्या मुख्य पानावर पैलतीर दालनाला पहिल्या दिवसापासून प्रचंड प्रतिसाद मिळाला. इंटरनेटचे जाळे हळूहळू पसरत असताना 'पैलतीर'मध्ये शेकडो वाचकांनी लिहायला सुरूवात केली.

सातासमुद्रापार अधिराज्य गाजवणाऱया मराठी वाचकांकडे अनुभवांचा मोठा खजीना तयार होत होता. 'ई सकाळ'ने हा अनुभवाचा खजिना 'पैलतीर'च्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध करून दिला. युनिकोडचा जन्म होण्यापूर्वी फॉण्टचा मोठा प्रश्न होता. यामुळे वाचक कागदावर हाताने लेख लिहून ते स्कॅन करून पाठवायचे. ई मेलच्या माध्यामातून अथवा पोस्टाद्वारे लेख व छायाचित्रे पाठवत. शिवाय, कार्यालयात दूरध्वनी करूनही सांगत. परदेशात गेलेल्या लेखकांचे अनुभव 'पैलतीर'च्या माध्यमातून प्रसिद्ध होऊ लागल्याने लेखकांसह वाचकांना अनुभवाची नवी द्वारे खुली झाली.

'पैलतीर'च्या माध्यमातून दर्जेदार लेख प्रकाशीत होत असताना मराठी वाचक 'ई सकाळ'शी जोडला जात होता. जगभरातील विविध कोपऱयांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी वाचकांना स्थानिक बातम्यांसह विविध लेख वाचायला मिळत होते. परदेशात स्थायिक झालेल्या मराठी वाचकांची नाळ 'ई सकाळ'च्या माध्यमातून महाराष्ट्राशी नव्याने जोडली गेली. इंटरनेटचा प्रसार वाढत असतानाच या विभागाच्या माध्यमातून लेखांसह छायाचित्रे व व्हिडिओची सुविधा उपलब्ध होत गेली.

विविध देशांत मराठी मंडळे भारतीय सण, समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करतात. संबंधित कार्यक्रमाची माहिती व छायाचित्रे 'ई सकाळ'कडे आवर्जून पाठवतात. 'ई सकाळ'च्या माध्यमातून ही माहिती जगभरातील मराठी वाचकांपुढे जाते. 'पैलतीर'मधील लेखांना जगभरातून मोठा प्रतिसाद मिळतो. इंग्लड, दुबई, अमेरिकेसह अन्य मंडळे 'ई सकाळ'चा उल्लेख आपल्या कार्यक्रमादरम्यान न चुकता करतात. जगभरात कोठेही मराठी समुहाचा कार्यक्रम झाला की त्याची माहिती 'ई सकाळ'वर यायलाच हवी, अशी प्रत्येकाची अपेक्षा असतेच असते. 'ई सकाळ'नेही ती नेहमीच पूर्ण केली आहे.

वाचकांच्या प्रतिक्रियांना प्राधान्य देणाऱया 'ई सकाळ'ने नव्या रचनेत वाचकांच्या लिहिण्यामध्ये थेट सहभागी करून घेतले आहे. 'पैलतीर'सह #OpenSpace या सदरामध्ये आपण आपले अनुभव लिहू शकता. आपले अनुभव जरूर शेअर करा...आजच आपले लेख, छायाचित्रे webeditor@esakal.com वर जरूर पाठवा. Subject मध्ये Pailteer जरूर लिहा.