esakal | आठवणीतल्या किशोरीताई 

बोलून बातमी शोधा

kishori amonkar
आठवणीतल्या किशोरीताई 
sakal_logo
By
शोभा जोशी

गोव्याला झालेल्या एका संगीत महोत्सवात मला गाण्याची संधी मिळाली होती. नेमके त्याच दिवशी महोत्सवाची सांगता किशोरीताईंच्या संगीताने होणार होती. माझे गाणे सुरू असतानाच किशोरीताईंचे आगमन झाले. परंतु त्या मंडपात न येता "ग्रीनरुम'मध्ये गेल्या. स्टेजपासून ग्रीन रुम अगदी जवळच होती. त्यामुळे स्टेजवर सुरू असलेले गाणे 
त्यांना ऐकू येत होते. ते ऐकून त्यांनी आयोजकांना विचारले कोण गात आहे बाहेर? छान गात आहे. कोणाच्या शिष्य आहेत या? अशी चौकशी केली असे मला नंतर संयोजकांनी सांगितले. माझे गाणे संपल्यावर मी ताईंना भेटण्यासाठी ग्रीन रुममध्ये गेले, त्यांना नमस्कार करून उभी राहात होते. तेवढ्यात तोच ताई म्हणाल्या,"" फार छान गातेस सुरीली आहेस, मी ऐकत होते इथून तुझे गाणे. 

दुसरा प्रसंग
पुण्यातील टिळक स्मारक मंदीरात संध्याकाळची मैफल होती. या कार्यक्रमातही माझे गाणे आधी आणि सांगता किशोरी ताईंच्या गाण्याने होणार होती. 
सायंकाळी "श्री' रागाने सुरवात केली. राग सुरू असतानाच ताई आल्या व दोन मिनिटे थांबून ग्रीन रुममध्ये गेल्या. गाणे झाल्यावर मी परत किशोरीताईंना भेटण्यासाठी गेले. 
"श्री'सारखा अवघड राग अप्रतिम गायलास.'' पुन्हा एकदा ताईंनी मला आशिर्वाद दिला. 

गानसरस्वती किशोरी ताईंच्या अनेक मैफीली मी लहानपणापासून ऐकत होते.त्या अद्वितीय गान तपस्विनी माझ्या सारख्या संगीताच्या क्षेत्रात धडपड करणाऱ्या गायिकेचे मनापासून कौतुक करावे ही माझ्यासाठी खूप मोठी दाद होती. माझ्या कलेचा सन्मान होता. कलेचे आणि कलाकारांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा मोठेपणा किशोरी ताईंकडे होता. 

आदरणीय पंडीत वामनराव देशपांडे आणि आदरणीय आप्पासाहेब जोगळेकर या दोघांचीही खूप इच्छा होती की, मी किशोरी ताईंकडे संगीताचे पुढील प्रशिक्षण घ्यावे आणि तसे ताईंनाही विचारले होते. माझ्या सुदैवाने किशोरी ताईंनी होकारही दिला. परंतु मीच त्यांच्याकडे विविध कारणांमुळे शिकण्यासाठी जाऊ शकले नाही, ही खंत अजूनही माझ्या मनात आहे. हा माझा सर्वांत मोठा तोटा आहे.