‘सागरी आणि खुष्कीच्या मार्गांचे जाळे जगभर विणण्याचे चीनचे स्वप्न बलोचिस्तान उधळून लावणार काय?’

China
China

पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतात उफाळणारा हिंसाचार वाढतोच आहे आणि आता चिनी नागरीक त्याचे लक्ष्य बनले आहे!

२०१५ मध्ये[२] जेंव्हां शी जिनपिंग या चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाने पाकिस्तानी हवाई हद्द ओलांडून पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश केला तेंव्हां पाकिस्तानी हवाई दलाच्या आठ लढाऊ विमानांनी आकाशात झेप घेऊन ते विमान सुखरूपपणे खाली उतरेपर्यंत त्या विमानाला सोबत केली. पाकिस्तानी नेत्यांनी या चिनी नेत्याचे अतीशय हार्दिकपणे स्वागत केले[३]. त्यांच्या दोन दिवसांच्या सरकारी दौर्‍यात शी यांनी अब्जावधी डॉलर्स किमतीच्या 'चीन पाकिस्तान आर्थिक महामार्ग' या प्रकल्पाच्या (CPEC. याचा 'सी-पेक' असा उल्लेख केला जातो) कित्येक उपप्रकल्पांबद्दलही घोषणा केल्या. 'सी-पेक' हा प्रकल्प 'सागरी आणि खुष्कीच्या मार्गांचे जाळे'[१] या चीनच्या महत्वाकांक्षी जागतिक प्रकल्पाचा भाग असून अवाढव्य बंदर असलेल्या ग्वादर शहराच्या विकासाचा महत्वपूर्ण भाग त्यात समाविष्ट आहे.

गंमत म्हणजे चित्रलिपीच्या कारणांमुळे चिनी माध्यमें जलमार्गाला 'रस्ता (road)' म्हणतात तर खुष्कीच्या मार्गाला पट्टा (belt) म्हणतात. इथे वरचा नकाशा हा प्राचीन काळातल्या 'रेशिम मार्गा'चा आहे, 'सी-पेक'चा नव्हे. रेशिम मार्गावरून 'सी-पेक'ला स्फूर्ती मिळाली आहे म्हणून तो मी संदर्भापुरता इथे दिलेला आहे. खालचा नकाशा मात्र खुद्द 'सी-पेक'चा आहे.)

पाकिस्तानच्या नैऋत्य दिशेला असलेल्या बलोचिस्तान या प्रांतामधील ग्वादर हे एके काळी कांहींसे अलिप्त पडलेले शहर एकाएकी तेजीत आले असून त्याची भरभराट होऊ लागलेली आहे. सी-पेकची घोषणा होताच पर्यटकांची ग्वादर शहर पहाण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यात पत्रकारांचाही समावेश होता. 'पर्ल कॉन्टिनेंटल' हे एकुलते एक पंचतारांकित हॉटेल बंद होण्याच्या मार्गाला लागले होते. आता तिथे पर्यटकांची एकच गर्दी उसळलेली आहे!

पण हा बदल सर्वांनाच आवडलेला आहे असे नाहीं. बलोची राष्ट्रवादींचा आणि भूमिगत संघटनांचा 'सी-पेक'ला प्रथमपासूनच विरोध होता, कारण त्यांना आपल्याच बलोच प्रांतात आपणच अल्पसंख्य होऊ याची खूप चिंता वाटत आलेली आहे[४]. बलोचिस्तानातील कुठल्याही सी-पेक प्रकल्पावर हल्ले घडवून आणण्याच्या धमक्या द्यावयास त्यांनी आधीपासूनच सुरुवात केली आहे.

या धमक्यांकडे दुर्लक्ष करण्यासारखी परिस्थिती अनेक कारणांमुळे नाहीं आहे. पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या १९९९ पासून ते २००८ पर्यंतच्या कार्यकालात बलोच बंडखोरांनी अनेक चिनी अभियंत्यांना आणि तंत्रज्ञांना ठार मारलेले आहे. त्यापैकी एक घटना ग्वादरमध्येच घडली होती. २००४ सलच्या मे महिन्यात बलोच बंडखोरांनी तीन चिनी अभियंत्यांना ठार मारले. हे अभियंते त्यावेळी आपल्या गाडीतून कामावर चालले होते. हमरस्त्यावर एक गतिरोधक (speed-breaker) दिसू लागल्यावर त्यांनी आपल्या गाडीची गती कमी केली त्याबरोबर जवळच एका गाडीत टपून बसलेल्या एका आतंकवाद्याने एक बॉम्बस्फोट दूरनियंत्रकाच्या सहाय्याने घडवून आणून त्या गाडीच्या समोर असलेला गतिरोधक उडवून टाकला होता. 

अलीकडील कांहीं वर्षांत हिंसाचार कांहींसा क्षीण होऊ लागला होता. कुठलेही नवे प्रकल्प कार्यरत नव्हते आणि त्यामुळे शहर पुन्हा एकदा नेहमीच्या संथ लयीवर स्थिरावले होते. पण सी-पेक च्या घोषणेनंतर, 'न्यूज इंटरनॅशनल' या पाकिस्तानी इंग्रजी वृत्तपत्रानुसार, चिनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लष्कराच्या आणि अन्य सुरक्षादलांच्या १७१७७ सुरक्षा कर्मचार्‍यांना पाकिस्तानने तैनात केले. त्यानंतरच्या कांहीं वर्षात ग्वादर हे एक लष्करी छावणीच बनून गेले, मग लष्कर, पोलीस आणि अन्य सुरक्षा कर्मचारी सतत गस्त घालू लागले आणि ग्वादर शहरात वावरणार्‍या स्थानिक लोकांना सुरक्षादलांच्या तपासणी नाक्यांमुळे सातत्याने जाच सोसावा लागू लागला. 

पण या पोलिसी गस्तीमुळे असे हल्ले बंद होण्यावर कांहीच परिणाम झालेला दिसला नाहीं. अलीकडील कांहीं महिन्यांत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या दोन घटनांनी या प्रांताला पुन्हा एकदा अशांततेच्या क्ड्यावर आणून बसविले आहे असेच दिसते. पहिला हल्ला १८ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आला होता. या हल्ल्यात लष्करी गणवेशात असलेल्या १५-२० बलोच बडखोरांनी एका बसला थांबविले आणि आतील सर्व चौदा प्रवाशांना खाली उतरायचा हुकूम दिला. ते खाली उतरताच त्या सर्वांना एक-एक करून गोळ्या घालून ठार मारले गेले. या चौदा प्रवाशांत बहुसंख्य लोक पाकिस्तानी नौदलातील कर्मचारी होते आणि तसेच सागर-किनारा-संरक्षक दलातील (Coast Guards) कर्मचारीही होते. बलोच बंडखोर या लष्करातील लोकांकडे "बलोचिस्तानचा प्रदेश व्यापणारे परकीय सैन्य" याच नजरेने पहात असतात!

पाठोपाठ ११ मे २०१९ रोजी ग्वादर शहराच्या मध्यभागी असलेल्या 'पर्ल कॉन्टिनेन्टल' या पंचतारांकित हॉटेलवर हल्ला करण्यात आला. हे हॉटेल ग्वादर बंदर आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या भूशिरावर बांधलेले आहे. हे हॉटेल प्रचंड मोठे आहे आणि परदेशी सन्माननीय अशा उच्चपदस्थांचे आवडते हॉटेल आहे. येथील सुरक्षा व्यवस्था खूपच कडक आहे आणि हे हॉटेल ग्वादर बंदराच्या खूपच जवळ असल्यामुळे तिथे अनेक लष्करातील अधिकारी असतात. 'बलिआ'[५]च्या (बलोचिस्तान लिबरेशन आर्मी) मजीद ब्रिगेडमधील तीन सशस्त्र हल्लेखोरांना येथील कमालीची कडक सुरक्षाव्यवस्था भेदण्यात यश मिळाले आणि त्यांनी हॉटेलमधील लोकांवर गोळीबार सुरू केला. अधिकृत सूत्रांनुसार या हल्ल्यात एकूण पाच लोक मृत्युमुखी पडले. त्यात हॉटेलचे चार कर्मचारी होते (त्यातले तीन सुरक्षादलातील पहारेकरी होते) आणि एक पाकिस्तानी नौदलातील अधिकारी होता.

'पर्ल कॉन्टिनेन्टल' हॉटेलवर झालेला हल्ला ही बलोचिस्तानमधील चिनी गुंतवणुकींसाठी अतीशय घातक घटनाच मानावी लागेल. या दोन महिन्यांपूर्वीपर्यंत ग्वादरच्या मध्यभागी असलेल्या भागावर, अगदी स्थानिक समर्थन मिळाले तरी, बलोच बंडखोर असा हल्ला करू शकतील अशी कल्पना करणेसुद्धा कठीण होते.  पण आता सध्या कुठलीही सुरक्षाव्यवस्था आतून पोखरून गेल्यासारखीच वाटू लागली आहे.

२०११ साली प्रस्थापित झालेली मजीद ब्रिगेड ही एक आत्मघाती तुकडी असून ती 'बलिआ'चाच भाग आहे आणि या तुकडीला नांव दिले आहे ते अब्दुल मजीद बलोच याचे. १९७४ साली यानेच तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांचा वध करण्याचा प्रयत्न केला होता. कारण फेब्रुवारी १९७३ साली लोकशाही मार्गाने बलोचिस्तानात सत्तेवर आलेले नॅशनल अवामी पक्षाचे सरकार भुत्तो यांच्या सरकारने बडतर्फ केले होते. त्यानंतर बलोच बंडखोरांनी पाकिस्तानी सरकारविरुद्ध युद्ध पुकारले होते. म्हणून १९७३ साली भुत्तो यांनी बलोच नेत्यांविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा हुकूम दिला होता. या कारवाईमुळे बलोचिस्तानात पाकिस्तान सरकारविरोधी एका मोठ्या बंडाळीला सुरुवात झाली होती आणि ती १९७७ पर्यंत टिकून होती. भुत्तोंच्या विरुद्धची कारवाई पार पाडण्याआधीच मजीद यांना सुरक्षादलाने ठार मारले.

इ.स. २००० साली 'बलिआ' संस्था प्रस्थापित झाल्यावर सुरुवातीची अनेक वर्षें तिने मुख्यत्वे पाकिस्तानी सुरक्षादलाच्या कर्मचाऱ्यांवर, बलोचिस्तान राज्यातील पायाभूत सुविधांवर आणि पंजाबमधून येऊन बलोचिस्तानात वसलेल्या उपऱ्यांवर हल्ले करावयास सुरुवात केली होती. अलीकडील काळात अस्लम बलोच[६] हे नेतेपदी आल्यापासून त्यांच्या मजीद ब्रिगेडने चिनी नागरिक आणि चिनी भांडवलाच्या सहाय्याने उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्या हल्ल्यांना प्रसार माध्यमांत हमखास आणि तात्काळ प्रसिद्धी मिळण्याची शक्यता होती अशा ठिकाणांवरच हे हल्ले केले जातात असे दिसून येऊ लागले. अस्लम बलोच यांना पुढे २०१८ साली नाताळ सणाच्या दिवशी कंदाहार येथे ठार मारण्यात आले! त्या आधी ऑगस्टमध्ये त्यांनी आपल्या रेहान बलोच[७] या मुलाला बलोचिस्तानमधील दलबंदिन या शहरातील चिनी अभियंत्यांवरील आत्मघाती हल्ल्यासाठी निवडले. या हल्ल्यामुळे अभियंत्यांना किरकोळ दुखापती झाल्या. त्याने कराची शहरातील चिनी कनिष्ठ दूतावासावर घडवून आणलेल्या हल्ल्यावरही देखरेख केली होती. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी आणि व्हीसासाठी आलेल्या दोन व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या!

वरील घटनांतून हे लक्षात येईल कीं मजीद ब्रिगेडच्या कारवायांना आता बरीच चालना येऊ लागली आहे. आणि त्यांना आता 'बलोच राज़ी आजोई सांगार'सारखे कांहीं नवीन गट येऊन मिळाले आहेत. हे गट म्हणजे खास सी-पेक प्रकल्पांवर हल्ले करण्यासाठी बनविलेली बलोच अलगवादी गटांची एक युती आहे. सुरुवातीपासूनच बलोची लोकांना चारी बाजूनी कोंडून बंदिस्त करून टाकले आहे. त्याना कधीही पाकिस्तानच्या इतर नागरिकांसमान वागणूक दिली गेलेली नाहीं आहे, त्यांना कधीही राज्यघटनेनुसार आर्थिक वा राजनैतिक संधी दिल्या गेलेल्या नाहीं आहेत. म्हणूनच कांहीं बलोची लोक शांततेने निषेध प्रकट करतात, कांहीं लोक कांहींच करत नाहींत तर कांहींनी पाकिस्तानी सरकारविरुद्ध हत्यार उचलले आहे!

सध्यापुरते बोलायचे तर चिनी प्रकल्पांच्या गतीवर याचा कांहीच परिणाम झालेला नाहीं. त्यांनी आता बलोचिस्तानमध्ये खूपच भांडवल गुंतविलेले असल्यामुळे त्यांना आता माघार घेणे शक्यच होणार नाहीं. तरीही परिस्थिति पुढे आणखीच तणावपूर्ण होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सामंजस्य करारारावर (memorandum of understanding) सह्या झाल्यानंतर ग्वादरमध्ये पाकिस्तान-इराण सीमेच्या अगदी जवळ एक कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करणारा कारख़ाना सौदी अरेबिया उभारत आहे. सौदी सरकारचे समर्थन लाभलेल्या आणि इराणलाच लक्ष्य करणाऱ्या सुन्नी पंथाच्या बलोच बंडखोरांना पाकिस्तान आश्रय देत असल्याचा आरोप इराणने पाकिस्तानवर केलेला आहे तर पाकिस्तानविरुद्ध लढणाऱ्या बलोच बंडखोरांना इराण आश्रय देत असल्याचा पाकिस्तानला विश्वास वाटतो! दरम्यान माकरान या ग्वादरभोवतीच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळवंटमय चिंचोळ्या जमीनीच्या पट्टयावर इराण मालकी हक्क सांगत आहे. बलोची बंडखोरांना मदत करून इराणला माकरान भागात शिरकाव करावयाचा आहे.

हे हल्ले जर असेच चालू राहिले तर सी-पेक प्रकल्य यशस्वीपणे पार पाडण्याची संधी आणि पाकिस्तानी हद्दीत सौदी-इराण यांच्यामधील तणाव सुधारण्याची शक्यताही कमी-कमी होत जाईल. म्हणूनच सी-पेक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानने बलोची जनतेला ग्वादर बंदराच्या विकासातील एक भागीदार असे मानून वागायला सुरुवात केली पाहिजे. पण दुर्दैव असे आहे की पाकिस्तानी सरकार बलोची लोकांना नेहमी एक समस्याच मानत आले आहे आणि ती समस्या सोडविण्याकडे पाकिस्तानी सरकारने कधीच लक्ष दिलेले नाही. वाढत्या हिंसाचाराचाही त्याच्यावर कांहींही परिणाम होणार नाही!

मूळ लेखक मुहंमद अकबर नोटेझई हे पाकिस्तानच्या दै. 'डॉन (Dawn)' या वृत्तपत्रासाठी काम करतात.
(मूळ लेखक मुहम्मद अकबर नोटेझई यांच्या आणि 'डॉन'च्या संमतीने)

टिपा:
[१] Belt & Road Initiative (BRI)
[२] हा लेख ३०-०५-२०१९ रोजी प्रकाशित झाला असला तरी घटना २०१५ पासूनच्या आहेत.
[३] नेत्याबरोबरच तो देणार असलेल्या पैशाचेही तितकेच जोरकस स्वागत होत होते!
[४] या उल्लेखावरून मराठी वाचकांना आपल्याच एका संघटनेचे स्मरण झाल्यास त्यात नवल नाहीं!
[५] बलोचिस्तान लिबरेशन आर्मी (बलिआ, BLA)
[६] https://cscr.pk/explore/themes/defense-security/aslam-balochs-killing-implications-for-balochistan-insurgency/ (ही माहिती मूळ लेखात नाहीं आहे पण वाचकांच्या माहितीसाठी मी इतरत्र शोधून इथे दिलेली आहे.)
[७] https://www.aninews.in/news/world/asia/baloch-fighter-dares-china-before-blowing-himself-in-a-fidayeen-attack201808111944500001/ (ही माहिती मूळ लेखात नाहीं आहे पण वाचकांच्या माहितीसाठी मी इतरत्र शोधून इथे दिलेली आहे.)
[८] या लेखात ज्या शहरांचा आणि स्थानाचा (उदा. सिस्टन) उल्लेख आलेला आहे ती आकृती क्र. ३ मध्ये दाखविलेली आहेत. (ही आकृती मूळ लेखात नाहीं आहे पण वाचकांच्या माहितीसाठी मी इतरत्र शोधून इथे दिलेली आहे.)
[९] बलोचिस्तानमध्ये कुठे कोणते लोक रहातात ते आकृती क्र. ४ मध्ये दाखविले आहे. (ही आकृतीसुद्धा मूळ लेखात नाहीं आहे पण वाचकांच्या माहितीसाठी मी इतरत्र शोधून इथे दिलेली आहे. तसेच पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलचे छायाचित्रही असेच इतरत्र शोधून मिळविलेले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com