esakal | झॅन्स स्कांस आणि डच पवनचक्क्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Zaanse-Schans

झॅन्स स्कांस आणि डच पवनचक्क्या!

sakal_logo
By
शंतनु देसाई, (shantanudenmark@gmail.com)

कोपनहेगन - माझे आजोबा, श्रीपूरला साखर कारखान्याच्या लॅबमध्ये काम करायचे. कुठल्याश्या मशीनमधून उसाचा रस बाहेर पडून एका मोठ्या विहिरीमध्ये साठायचा आणि आजोबा आणि त्यांचे मित्र, या विहिरींमधून पाहिजे तेवढा उसाचा रस पिऊ शकायचे, हे त्यांनी सांगितलं तेव्हा उसाच्या रसाची विहीर आणि त्या विहिरीमध्ये रस ओतणारं अजस्त्र असं मशीन कसं असेल याची मी कल्पना करत बसायचो. कधी कधी कारखान्यांमधल्या यंत्र सामग्रीबद्दल त्यांनी सांगितलेलं मला पुसटसं आठवतं, पण ते सांगताना त्या यंत्राबद्दल किंवा यंत्रामागच्या तंत्रज्ञानाबद्दल त्यांना असलेला निस्सीम आदर स्पष्ट आठवतो. माझ्यासारखं ८० / ९० च्या दशकामध्ये ज्यांनी बालपण अनुभवलं त्यांच्यासाठी पीठ दळायची गिरणी आणि त्या गिरणीमधलं ते मशीन हे नेहमीच कुतूहलाचा विषय असायचा. पिठामध्ये माखलेले गिरणीतले काका आणि मधूनच दगडाने आपटून आतून चिकटून राहिलेलं पीठ बाहेर पडायचं तेव्हा खरंच भारी वाटायचं. आता मोटारवर चालणारं गिरणीचं मशीन यायच्या आधी कदाचित जात्यावरच दळत असावेत आणि या जात्याबद्दलही त्या काळच्या लोकांना तेवढंच कुतूहल असेल. तात्पर्य हेच की यंत्र आणि त्या मागील तंत्रज्ञान हे कायमच मनुष्याच्या कुतूहलाचे, आदराचे विषय असतात आणि असलेच पाहिजेत.

हे आठवायचं कारण म्हणजे, “झॅन्स स्कांस!” अ‍ॅमस्टरडॅम जवळ असलेला झॅन्स स्कांस हा प्रदेश. म्हणजे डच लोकांच्या औद्योगिक आणि उद्योजक प्रवृतीचा जपलेला इतिहासातील एक कालखंड आहे. हा प्रदेश दिसायला तर अतिशय देखणा आहेच, पण तो ज्या अदम्य अश्या मानवी इच्छाशक्ती आणि कौशल्याचे प्रतीक आहे, त्या समोर नतमस्तक व्हायला होते. ‘झान’ नदीच्या आसपास वसलेल्या झाण्डाम या शहराच्या वेशीवर झॅन्स स्कांस वसलं आहे. १७व्या शतकामध्ये डच लोकांनी स्पॅनिश राजवटीला ८० इयर वॉर (ऐंशी वर्ष चाललेलं युद्ध) मध्ये चांगलंच झुंजवलं होता आणि त्याचा शेवट सुद्धा डच हे स्वतंत्र गणतंत्र असल्याचं स्पेन नी मान्य करून झाला. एका अर्थे आजच्या नेदरलँड्स ( हॉलंड) ला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते हे युद्ध. याच युद्धामध्ये डच सैन्यांनी बांधलेल्या संरक्षणात्मक तटबंदी मधील एक म्हणजे झॅन्स स्कांस. झान नदी म्हणून ‘झॅन्स’ आणि डच भाषेमध्ये तटबंदी म्हणजे स्कांस. आता या तटबंदी तर राहिल्या नाही आहेत पण युद्ध संपल्या नंतर १८व्या आणि १९व्या शतकामध्ये झालेली औद्योगिक क्रांती आणि त्यामुळे झान परिसरामध्ये आलेली समृद्धी याचे सुंदर जतन इथे बघायला मिळते.

पश्चिम युरोपातील सर्वात जुनी औद्योगिक वसाहत असलेल्या ‘झान’नी, १७व्या शतकातील डच सुवर्ण काळाचा पुरेपूर लाभ घेतला. स्थानिक लोकांनी त्या काळात, जवळच्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये येणाऱ्या जग भरातील जहाजांसाठी साजेसे जलमार्ग बनवले आणि त्या बरोबर काही डझन पवनचक्क्याही! या जहाजांमधून येणाऱ्या वेग वेगळ्या कच्या मालांमधून, विविध उत्पादनं जसे की कोकोआ, पेपर, लाकडाचे काप, तेल इत्यादी बनवण्याचे काम या परिसरातील उद्यमशील लोकांनी पवनचक्यांच्या साहाय्याने सुरु केले. कोर्नेलियस उटगीस्ट नावाच्या डच माणसाने, पवनचक्क्यांना क्रांकशाफ्ट लावून एक अतिशय महत्वाचा शोध लावला होता. या मुळे वाऱ्यानी गोल आडव्या फिरणाऱ्या पात्यांची क्रीया ही वर खाली म्हणजेच व्हर्टिकलमध्ये रुपांतरीत करता येऊ लागली. यामुळे लाकूड कापणे सोयीस्कर तसेच ३० पट अधिक वेगानी होऊ लागले. एक मजेशीर गोष्ट कळली ती म्हणजे त्या काळी सुद्धा हातानी लाकूड कापून अ‍ॅमस्टरडॅम मधल्या जहाज बनवणाऱ्या उद्योगाला पुरवठा करणारे बरेच ‘कारखाने’ होते. या हातानी लाकूड कापणाऱ्या कारखान्याच्या लॉबीला पवनचक्या म्हणजे प्रतिस्पर्धी वाटू लागले होते आणि त्यांनी त्याकाळी सुद्धा आपल्या राजकीय किंवा सामाजिक दबाव वापरून अ‍ॅमस्टरडॅममध्ये पवनचक्क्या उभारण्यावर काही काळ बंदी आणली.. झानवासियांनी या संधीचा सुंदर लाभ घेत, अ‍ॅमस्टरडॅमच्या अगदी लागून, जिथे या लॉबीचा प्रभाव नव्हता तिथे पवनचक्या उभारल्या आणि स्वतःच्या आणि झान प्रदेशाच्या उन्नतीचे मार्ग खुले केले. अर्थात काही दशकांमध्येच ही चक्यांवरची बंदी उठवण्यात आली कारण हातानी लाकूड कापणाऱ्या कारखान्यांना, डच सुवर्ण काळामुळे तसेच डच ईस्ट इंडिया कंपनीच्या ईस्ट इंडिज मोहिमांसाठी निघणाऱ्या जहाजांसाठी लागणारे लाकूड पुरवणे अशक्य झाले होते. आणि पवनचक्क्यांचा अवलंब करण्यावाचून पर्यायच उरला नाही. तंत्रज्ञानाला काही काळ रोखून धरता येऊ शकते पण तसे ते प्रगल्भ होत जाते आणि त्याचे फायदे स्पष्ट होतात तसे जो कुठला समाज, सामाजिक आणि मानसिक न्यूनगंड किंवा रूढी झूगारून ते आत्मसात करतो त्यालाच इतिहासामध्ये यशस्वी झाल्याचा कौल मिळालेला स्पष्ट दिसते.

त्यावेळच्या आधुनिक तंत्रज्ञानाला स्वीकारून, पवनचक्या उभारणाऱ्या झान प्रदेशाने १८व्या शतकामध्ये सुद्धा तितकीच जोमाने झेप घेतली. त्यातही नवीन नवीन शोध लावत, सुधारणा करणे कुठेच थांबले नाही. या मानसिकतेच्या जोरावरच एका वेळेस ६०० च्या आसपास पवनचक्क्या या औद्योगिक पंढरीमध्ये कार्यरत होत्या आणि असंख्य गोष्टी निर्माण करत होत्या. अर्थात यांत्रिकी लाकूड कापणे हे होतंच होते पण त्याच बरोबर पेपर, मसाले, अन्न आणि पेंटमध्ये वापरात असलेले तेल पदार्थ, रंग, वेग वेगळे दोरे, पिठं, कोकोआ पावडर.. अशी अनेकानेक उत्पादनं झानमध्ये या पवनचक्यांच्या साहाय्याने बनून अख्या जगामध्ये पोचत होती. एका पवनचक्कीच्या कार्यपद्धतीमध्ये आणि शिडाच्या जहाजाच्या कार्यपद्धतीमध्ये कमालीचा साधर्म्य आहे. जसं जहाजाला कॅप्टन असतो तसाच पवनचक्की म्हणजे विंडमिलला मिलर असायचा. हा मिलर त्याचा कुटुंबाबरोबर विंडमिलमधेच राहायचा आणि ज्या कश्या साठी ती चक्की कार्यरत असेल त्याचा गरजेनुसार पवनचक्की चालू राहील ह्याची खबरदारी घ्यायचा. पवनचक्यांचं शीर म्हणू शकतो ज्याला पाती असतात ते सहज काही टनांमध्ये जड असतं आणि तरी एका जहाजाला असतं तश्या कॅप्टन्स व्हील च्या साह्याने हा मिलर ते ३६० डिग्रीमध्ये फिरवू शकायचा. वारा ज्या दिशेनी वाहतोय त्या दिशेला पवनचक्की वळवण्यासाठी हि सोय शेकडो वर्षांपूर्वी होती हे ऐकून ज्याला कुणाला हि यंत्रणा सुचली आणि ज्यांनी कोणी ही अमलात आणली, त्यांना खरंच ‘हॅट्स ऑफ’ म्हणावंसं वाटतं! पवनपुत्र हनुमान आपल्याकडील आराध्य दैवत पण डच लोकांनी ‘पवनाचा’ हा केलेला खरा यज्ञ आहे असा म्हणायला हरकत नाही आणि यज्ञातून मिळायचे ते प्रसाद, समृद्धी आणि संपन्नतेच्या मार्गानी त्यांना मिळाले सुद्धा.

हे सर्व होत असताना नवीन तंत्रज्ञानाला न अंगिकारल्यामुळे, एके काळी टेक्सटाईलमध्ये जगात निर्विवाद वर्चस्व असलेल्या भारताला, ब्रिटिशांनी याच टेक्सटाईल क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करून, स्पर्धेमध्ये नमवलं. तेवढंच नाही तर भारतच त्यांच्या साठी खूप मोठी बाजारपेठ पण होताच! आपापसातल्या युद्धांमुळे असो, मुघली आक्रमण आणि राज्य कर्त्यांमुळे असो, फक्त युद्धाशी निगडित शोधावर प्राधान्य आणि त्यातच झालेल्या गुंतवणीमुळे असो, कला आणि शास्त्राला मिळालेल्या नगण्य पाठबळामुळे असो आणि सर्वात महत्वाचं बदलत्या काळात न बदलता नवीन तंत्रज्ञानाला न अंगिकारल्यामुळे, औद्योगिक क्रांतीमध्ये, आपण देश म्हणून मागे पडलो हे वास्तव आहे आणि त्याचे परिणाम अजूनही आपण भोगतो आहे, हे ही मान्य करण्यावाचून पर्याय नाही.

तुम्हाला प्रश्न पडेल कि आता तर पवनचक्क्या कुठल्याही कारखान्याचा प्राथमिक ऊर्जा स्रोत असणं शक्यच नाही, पण तरी सुद्धा झॅन्स स्कांसमध्ये त्या कश्या काय कार्यरत आहेत? बरोबर आहे. जसे स्टीम इंजिन, कोळसा, विद्युत ऊर्जा आदी स्रोत जगमान्य होत गेले, तसं पवनचक्की मागे पडत गेली. साहजिकच होतं, जलद आणि कार्यक्षम तंत्रज्ञान आज ना उद्या संथ आणि किचकट कार्यपध्दतींना मागे टाकणारच! पण तरीही झाण्डाम शहरातील लोकांना, त्यांचा प्रदेशाल अभूतपूर्व अश्या समृद्दीचा मार्गावर नेलेल्या पवनचक्क्यांना विसरणं पटत नव्हतं. नवीन कारखाने बनत असल्यामुळे पवनचक्क्या मोडीत निघत होत्या. पण जुनी संस्कृती काही प्रमाणात टिकवण्यासाठी किंवा त्या जुन्या पण प्रदेशाच्या कायापालटाला कारणीभूत अश्या काळाला मानवंदना म्हणून, झाण्डाम मधील नागरिकांनी या इतिहासाला शाबूत ठेवायचं ठरवलं. आर्किटेक्ट याप शिपर यांनी झॅन्स स्कांसची स्थापना केली आणि १९६१ ते १९७६ या काळामध्ये इथे दिसत असलेली जुनी घर, चीज फॅक्टरी, रेस्टॉरंट, काही पवनचक्क्या हे अक्षरशः जसच्या तसं इथे हलवण्यात आलं! इथे काही फोटो देत आहे..

काही घर लॉरीच्या साहाय्याने इथे हलवण्यात आली, तर काही एक एक वीट काढून इथे जशीच्या तशी पुन्हा बांधण्यात आली. आपण जेव्हा झॅन्स स्कांसमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्ही खरंच इतिहासात जाता आणि १८५० मधल्या एका युरोपियन वसाहतीमध्ये प्रवेश करता. त्या काळातली घरं, बेकरी, डेअरी, एक चीज फॅक्टरी, कोंबड्याची खुराडं, मेंढ्या,  कॅनॉल आणि पाण्याला लागून असलेली विंडमिल्स.. एकदम नॉस्टॅल्जिक वाटेल असं वातावरण बनवण्यात झॅन्स स्कांस कमालीचा यशस्वी झालंय. कुठलीही गोष्ट मनापासून केली कि त्याची कला होते असं मला खरंच वाटतं. झॅन्स स्कांस ज्यांनी बनवलं त्यांना हे साध्य झालंय आणि म्हणूनच सर्वच परिसर एक सुंदर अशी कलाकृतीचं वाटते.

आधी म्हंटल्या प्रमाणे, खूप देखणा आणि प्रेरणादायी असा हा परिसर. देखणा का हे तुम्हाला या छायाचित्रांमधून कळलंच असेल आणि प्रेरणादायी का हे त्याचा औद्योगिक प्रगतीच्या इतिहासातून आणि तो इतिहास जपून ठेवण्याचा ह्या लोकांचा ओढीतून. इतिहास म्हणजे भूतकाळ. भूतकाळाला कवटाळून न बसता, त्याचा उदो उदो न करता, आपल्याला इतिहासातून फक्त सकारात्मक आणि प्रगतिशील अश्या विचारांची प्रेरणा मिळाली तर? भारताचा इतिहास आणि संस्कृती खरंच खूप वैभवशाली राहिली आहे. पण आर्यभट्टानी शून्य शोधून काढला ह्यातच आपण आज खुश होऊन काय उपयोग? तसं म्हंटलं तर १७ व्या किंवा १८ व्या शतकातल्या आणि आत्ता आपल्या जीवनशैली मध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. पण समृद्धीची, प्रगतीची, समाजाच्या तसेच वैयक्तिक उन्नतीची सूत्र अगदी तंतोतंत सारखी आहेत. चांगलं ते घेऊन पुढे चला पण मागे खेचत असतील अश्या जुन्या रूढी, परंपरा अलगद सोडून द्या. नवीन तंत्रज्ञान तसेच एखादी गोष्ट करायची नवीन पद्धत समोर येत असेल तर त्याचा तिरस्कार वगरे न करता स्वीकार करा आणि आत्मसात करा. समृद्धीच्या मार्गावर आगेकूच करताना आपण नैसर्गिक हानी करून अजिबात चालणार नाही ही पण शिकवण इथे मिळतेच.

मावळत्या सूर्यामध्ये मंद वेगानी फिरणाऱ्या पवनचक्क्यांना आणि त्यांचं उत्तम संवर्धन करणाऱ्यांना मनोमन नमस्कार करून झॅन्स स्कांस वरून संध्याकाळी निघालो तेव्हा अशे बरेच विचार मनामध्ये दाटले होते.

नवीन विचारांची ऊर्जा देणाऱ्या या अनोख्या प्रदेशाला आणि त्याची काळजी घेणाऱ्या सर्वाना माझा सलाम!