'झुंजार'ने दिला 'टोरोंटोच्या राजा'ला मराठमोळा निरोप

टीम ईसकाळ
Friday, 13 September 2019

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कॅनडाची राजधानी असलेल्या ओटावा शहरात नवोदित झुंजार ढोल ताशा पथकाने ढोल वाजवून आपली यशस्वी घोडदौड सुरू केली.

टोरोंटो : अस्सल मराठमोळ्या संस्कृतीविषयी प्रेम आणि आदराची भावना निर्माण करून या संस्कृतीची मुळे परकीयांच्या मातीत रूजवून तिचा सर्वत्र प्रसार करण्याची तीव्र इच्छा असलेले पंधरा युवक/युवती जेव्हा एकत्र आले तेव्हा झुंजार ढोल ताशा पथकाचा उदय झाला. या ढोल पथकाने बाप्पाला आपल्या वादनाने निरोप दिला. 

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कॅनडाची राजधानी असलेल्या ओटावा शहरात नवोदित झुंजार ढोल ताशा पथकाने ढोल वाजवून आपली यशस्वी घोडदौड सुरू केली.

कॅनडा मधील सर्वात लोकप्रिय गणेश मंडळ अशी ख्याती असलेला टोरोंटोचा राजा म्हणजेच टोरोंटो गणेश मित्र मंडळाचे (TGMM ) हे यंदाचे ९ वे वर्ष आहे. या बाप्पाची खासियत म्हणजे ह्याची स्थापना एका चर्च मध्ये केली जाते. टोरोंटो शहरातील फक्त महाराष्ट्रीयन नव्हे तर सर्व भारतीय बांधव  या उत्सवाचा लाभ घेतात. या वर्षी झुंजार ढोल ताशा पथकाने टोरोंटो च्या राजाच्या चरणी देखील आपली सेवा अर्पण केली आणि उपस्थित सर्व बांधवांची मने जिंकली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने झुंजारपथकाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून ढोलवादनाचा कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्हाला ठिकठिकाणहून आमंत्रणे येत आहेत. आपल्या लाडक्या बाप्पासाठी झुंजार ढोल ताशा पथकाने संपुर्ण टोरोंटो शहरात 2019 च्या गणेशोत्सवात विविध ठिकाणी आपली कला सादर करताना त्यांच्यातील अफाट उर्जेचे प्रदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ढोलवादनाच्या नादात आकंठ बुडालेला प्रेक्षकवर्ग कार्यक्रमात अगदी पूर्णपणे समरसून गेला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zunjar dhol pathak at Toronto Ganpati Visarjan Miravnuk