रोषणाईने उजळले शहर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 August 2017

गडहिंग्लज - भाविकांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या गणरायाची वाजत-गाजत प्रतिष्ठापना झाली आहे. शहरातील ३५ हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईने शहर उजळून गेले आहे. यंदाही बहुतांश मंडळांनी भव्य मूर्तींवर आणि विद्युत रोषणाईवरच भर दिला आहे. उर्वरित अर्ध्या डझनाहून अधिक मंडळांच्या देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

गडहिंग्लज - भाविकांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या गणरायाची वाजत-गाजत प्रतिष्ठापना झाली आहे. शहरातील ३५ हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईने शहर उजळून गेले आहे. यंदाही बहुतांश मंडळांनी भव्य मूर्तींवर आणि विद्युत रोषणाईवरच भर दिला आहे. उर्वरित अर्ध्या डझनाहून अधिक मंडळांच्या देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे. येथील गणशोत्सवालाही सहा दशकांची देदीप्यमान परंपरा आहे. शिवाजी चौकातील काळभैरव गणेशोत्सव मंडळ (स्थापना १९५६) हे सर्वांत जुने होय. त्यानंतर गणेश टाऊन मंडळाने १९७२ ला देखाव्यांची प्रथा सुरू केली. ऐंशीच्या दशकात ग्रामीण भागातून लोक बैलगाड्यातून देखावे पाहायला यायचे. 

लगतच्या बेळगाव आणि कोल्हापूर येथील गणेशोत्सवाचा प्रभाव या ठिकाणी पडला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या दरवर्षी वाढत जाऊन ती सध्या शहरात ३५, तर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात १४६ वर पोचली आहे. 

शुक्रवारी (ता. २५) गणेशाचे आगमन झाले. दुपारनंतर सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तीन आठवडे दडी मारलेल्या पावसानेही गणेशाबरोबर पुनरागमन केल्याने भाविकांसह शेतकरीही सुखावला आहे. घरगुती गणेशोत्सवासाठी यंदा एक दिवस वाढला आहे. 

घरगुती गणेश विसर्जनानंतरच दरवर्षी देखावे खुले होतात. त्यामुळे देखाव्यांच्या तयारीसाठी एक आठवड्याचा कालावधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांचे नियोजन सुरू आहे.

वाढती महागाई, पुरस्कर्त्यांचा अभाव आणि कार्यकर्त्यांची वानवा यांमुळे देखावा करणाऱ्या मंडळांची संख्या दरवर्षी घटतच चालली आहे. त्या ऐवजी भव्य मूर्ती, विद्युत रोषणाई यावरच मंडळांचा अधिक भर आहे. गेल्या दशकभरात महाप्रसादाची क्रेझ वाढली आहे. वीसहून अधिक मंडळे दरवर्षी महाप्रसाद करून अन्नदानाचे काम करत आहेत. केवळ हातावर मोजण्याइतपत मंडळांनी देखाव्यांची परंपरा चिकाटीने जपली आहे. या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या रात्री जागू लागल्या आहेत. दोन दिवसांत शेवटचा हात फिरवून शुक्रवारी (ता. १) देखावे खुले करण्यासाठी धडपड सुरू आहे.

महाप्रसादाचा नारळ फुटला
येथील एम. आर. हायस्कूललगत असणाऱ्या आझाद तरुण मंडळाने यंदा सर्वप्रथम महाप्रसाद सुरू करून या उपक्रमाचा नारळ फोडला. दोन हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अध्यक्ष श्रीरंग राजाराम आणि सहकाऱ्यांनी याचे नियोजन केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 Gadhinglj news lighting