गणेशोत्सवात 10 हजार चिरमुरे पोत्यांची होणार विक्री 

अमोल सावंत
रविवार, 27 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : गणेशमूर्तीसमोर ढम ढम वाजणारे ढोल, कडाडणाऱ्या हालगी-ताशाच्या नादावर नाचणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जेव्हा चिरमुऱ्यांची उधळण होते, तेव्हा मिरवणूक अधिक रंगतदार होते. गुलालापेक्षा चिरमुरे उधळणीचा हा बाजच मिरवणुकीला उठावदारपणा आणतो. एरव्ही आठवड्यातून चिरमुऱ्याची दोन पोती विक्री करणारा किरकोळ व्यापारी गणेशोत्सवात दिवसाला वीस ते पंचवीस पोती चिरमुरे विक्री करतो. गणेशोत्सव काळात चिरमुऱ्यांची ही विक्री अंदाजे पाच ते दहा हजार पोती होते.

हावळ्या भातापासून तयार केलेला कोल्हापुरी चिरमुरा 120 रुपयांप्रमाणे विकला तरी ही उलाढाल दहा ते बारा लाखांपर्यंत पोचते. 

कोल्हापूर : गणेशमूर्तीसमोर ढम ढम वाजणारे ढोल, कडाडणाऱ्या हालगी-ताशाच्या नादावर नाचणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जेव्हा चिरमुऱ्यांची उधळण होते, तेव्हा मिरवणूक अधिक रंगतदार होते. गुलालापेक्षा चिरमुरे उधळणीचा हा बाजच मिरवणुकीला उठावदारपणा आणतो. एरव्ही आठवड्यातून चिरमुऱ्याची दोन पोती विक्री करणारा किरकोळ व्यापारी गणेशोत्सवात दिवसाला वीस ते पंचवीस पोती चिरमुरे विक्री करतो. गणेशोत्सव काळात चिरमुऱ्यांची ही विक्री अंदाजे पाच ते दहा हजार पोती होते.

हावळ्या भातापासून तयार केलेला कोल्हापुरी चिरमुरा 120 रुपयांप्रमाणे विकला तरी ही उलाढाल दहा ते बारा लाखांपर्यंत पोचते. 

चिरमुरा हा वर्षभर कधी भेळ, भडंग, लाडू, अन्य रेसिपीज तयार करण्यासाठी घेतला जातो; पण गणेशोत्सव, दिवाळी, पाडव्याच्या काळात तो सर्वाधिक विकला जातो. अलीकडे चवीला उत्कृष्ट असणाऱ्या कोल्हापुरी चिरमुऱ्याचे उत्पादन तुलनेने कमी झाले आहे; कारण या चिरमुऱ्याला लागणाऱ्या हावळ्या भाताच्या क्षेत्रात अनेक कारणांनी घट झाली आहे. जास्त उत्पादन देणाऱ्या अन्य भाताच्या अनेक जाती उपलब्ध असल्यामुळे हावळ्या भाताचे उत्पादन घेण्याकडे कल कमी होत आहे. याशिवाय नैसर्गिक कारणेही आहेत. घरगुती गणपतीचे आगमन झाले, की अन्य पदार्थांबरोबर चिरमुरे खरेदी केले जातातच. मिरवणुकीबरोबर अनेक ठिकाणी चिरमुरा प्रसाद म्हणून दिला जातो. 

''अनंत चतुर्दशीपेक्षा घरगुती गणेश विसर्जनादिवशी चिरमुऱ्यांची सर्वाधिक विक्री होते. गणपती मूर्ती विसर्जनाला नेताना चिरमुरे ढोल-ताशांसह उधळत नेण्याची परंपरा आहे. यामुळे विसर्जनाआधी दोन दिवस किंवा गणपती आगमनादिवशीही चिरमुरे खरेदी केले जातात. याशिवाय नैवेद्यालाही चिरमुऱ्यांपासून तयार केलेले पदार्थ दाखवितात. चिरमुऱ्यांपासून अनेक रेसिपीज तयार करता येतात. चिरमुरा हा सर्व वयोगटात लोकप्रिय आहे. चिरमुऱ्याची उधळण असेल तर मिरवणूक अधिकाधिक रंगतदार होते. गणेशोत्सवात पोत्याने चिरमुरे खरेदी केले जातात.'' 
- अशोक खराडे 

''चिरमुऱ्याचे एक पोते तयार करायला चार दिवस लागतात. ही एक प्रक्रिया असते. या प्रक्रियेनंतर दोन ते तीन तासांत चिरमुरा तयार होतो. पाच ते सहा कामगार लागतात. आम्ही रोस्टरवर चिरमुऱ्याची निर्मिती करतो. दररोज एक टन (एक हजार किलो) चिरमुऱ्यांचे उत्पादन घेतले जाते. चिरमुरा ही एक अशी वस्तू आहे, जिचा नित्य वापर होत असतो. गणेशोत्सव काळात मात्र चिरमुरे तुलनेने जास्त विक्री होतात. यासाठी जास्त उत्पादन घेऊन ते विक्रीस ठेवले जातात. चिरमुरा कुरकुरीत राहण्यासाठी तो व्यवस्थित पॅकेजिंग करून ठेवला जातो. '' 
- मन्सुर मुल्लाणी, मुल्लाणी ट्रेडर्स : द फुड मॉल 

चिरमुरे चिरमुरे (प्रति किलो रुपये) 

 • बेळगाव एंटान 80 रुपये 
 • बेळगाव क्रॉस एंटान 90 
 • कोल्हापुरी जवारी चिरमुरा 120 
 • गव्हापासून तयार केलेले चिरमुरे 120 
 • नाचणीचे चिरमुरे 250 
 • बाजरीचे चिरमुरे 250 
 • आंध्र प्रदेशच्या कारागिरांकडून तयार केलेले चिरमुरे 90 रुपये 
 • चिरमुरा लाडू 25 रुपये पॅकेट (12 लाडूंचा समावेश) 
 • एक नंबरच्या चिरमुऱ्याचे आठ किलोंचे पोते 900 रुपये 
 • 80 रुपये किलोप्रमाणे आठ किलोंचे पोते 550 रुपये 
 • 90 रुपये किलोप्रमाणे आठ किलोंचे पोते 650 रुपये 
 • मिरवणुकीसाठी मंडळांकडून 550, 650 रुपयांचे पोते खरेदी केले जाते. 

एक नजर चिरमुऱ्यांवर 

 • गणेशोत्सव काळात कोल्हापुरात अंदाजे पाच ते दहा हजार पोत्यांची विक्री 
 • कोल्हापूर परिसरात बेळगावी एंटान, बेळगाव क्रॉस एंटान, कोल्हापुरी जवारी चिरमुरे मिळतात. 
 • शहर परिसरात किरकोळ व्यापारी दहा ते 15 
 • किराणा मालाच्या दुकानातून सर्वाधिक विक्री 
 • हातगाड्यांवरुनही विक्री 
 • होलसेल व्यापारी तीन ते चार 
 • फक्त चिरमुऱ्यांसाठी फुड मॉल एक 
 • शहरात सणासुदींशिवाय चिरमुऱ्याची विक्री दीड ते दोन टन 
 • गणेशोत्सवात 40 टक्के विक्रीत वाढ 
 • बेळगाव एंटान, बेळगाव क्रॉस एंटान चिरमुऱ्यांचा मंडळांकडून वापर 
 • घरगुती गणेशोत्सवासाठी कोल्हापुरी जवारी चिरमुऱ्यांची खरेदी 
 • हुपरी, निपाणी, कर्नाटकातील अन्य भागांत रेड्डी कारागिरांकडून चिरमुऱ्यांची निर्मिती 
 • आंध्र प्रदेशी चिरमुरे म्हणून ओळख 
 • आंध्र प्रदेशी चिरमुरा हा कोल्हापुरी चिरमुऱ्यासारखा दिसतो; पण चवीला कमी, जास्त काळ टिकत नाही. 
 • ग्रामीण भागात आंध्र प्रदेशी चिरमुरा 50 रुपये किलोनेही विक्री 
 • चिरमुऱ्यांचे तुलनेने कोल्हापुरात उत्पादन कमी 
 • गणेशोत्सव काळात सांगलीहून जास्त चिरमुरे मागविले जातात. 
 • बेळगाव इटान हा बारीक चिरमुरा 
 • बेळगाव क्रॉस इटान साधारण मोठा चिरमुरा 
 • कोल्हापुरी जवारी चिरमुरा हा हावळ्या भातापासून तयार करतात. 
 • हावळ्या भाताच्या उत्पादनात अनेक कारणांनी घट 
 • ऊस, सोयाबीनमुळे भाताच्या क्षेत्रात घट 
 • हावळ्या भाताचे चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड भागात पीक 
 • चिरमुरे लाडवात गूळ, शेंगदाणा, वेलची असते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Kolhapur Ganesh Utsav