गणेश मूर्तींच्या वाहतुकीने अघोषित भारनियमन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

सातारा - सार्वजनिक गणेश मंडळांच्या १८ ते २३ फूट उंचीच्या मूर्तींमुळे शहराच्या काही भागास अंधारात राहावे लागत आहे. प्रतिष्ठापनेचे दोन आणि विसर्जनाचे दोन दिवस असे चार दिवस नागरिकांना अघोषित भारनियमनाला तोंड द्यावे लागते. आरासपेक्षा मूर्तींच्या उंचीवर मंडळांनी जोर दिल्याने शहरातील काही पेठांवर अंधारात बसण्याची वेळ आली आहे. 

सातारा - सार्वजनिक गणेश मंडळांच्या १८ ते २३ फूट उंचीच्या मूर्तींमुळे शहराच्या काही भागास अंधारात राहावे लागत आहे. प्रतिष्ठापनेचे दोन आणि विसर्जनाचे दोन दिवस असे चार दिवस नागरिकांना अघोषित भारनियमनाला तोंड द्यावे लागते. आरासपेक्षा मूर्तींच्या उंचीवर मंडळांनी जोर दिल्याने शहरातील काही पेठांवर अंधारात बसण्याची वेळ आली आहे. 

गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुख्य दिवशी रस्त्यावरील गर्दी, वाहतुकीची कोंडीमुळे काही सार्वजनिक गणेश मंडळे दोन दिवस आधीच गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जातात. गडकर आळी, शुक्रवार पेठ व बुधवार पेठेत बहुतांश मोठ्या उंचीच्या मूर्ती तयार होतात. उंब्रजसह सातारा तालुक्‍यातील काही मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणारी मंडळे गडकर आळीतूनच मूर्ती नेतात. या मूर्तींना वीज वाहक तारांचा अडथळा होतो.

आरास करण्यापेक्षा भव्य मूर्ती बसविण्याचा अलीकडील ‘ट्रेंड’ आहे. त्यामुळे १५ ते १७ फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तींनी गेल्या दोन वर्षांत उंचीची मर्यादा ओलांडत २३ ते २५ फुटांपर्यंत गेल्या आहेत. गडकर आळीतील मूर्तिकारांकडे सर्वांत उंच मूर्ती तयार होतात. या मूर्ती नेण्याच्या मार्गावर वीज कंपनीच्या तारांचा अडथळा होतो. गणेशमूर्ती घेऊन येताना महावितरणच्या कर्मचाऱ्याला सोबत घेऊन रस्त्यात लागणाऱ्या वीज तारांचा प्रवाह बंद केला जातो. 

कालपासून (ता. ९) गडकर आळीतून मोठ्या आकाराच्या मूर्ती नेण्यास सुरवात झाली. दुपारी दीड वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, भवानी पेठ, यादोगोपाळ पेठेचा काही भाग या भागातील वीजपुरवठा खंडित ठेवावा लागला. हे एखादे दिवस ठिक आहे; परंतु ‘श्रीं’च्या आगमनापूर्वी दोन दिवस आणि मूर्ती विसर्जनापूर्वी दोन दिवस, तसेच विसर्जन मिवणुकीचा मुख्य दिवस असे चार- पाच दिवस नागरिकांना अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागते. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या मंडळांच्या उंच मूर्ती सहभागी होत असताना त्या परिसरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित करण्यात येतो. शनिवार व गुरुवार पेठ या पेठांमधील रहिवाशांना मुख्य विसर्जन मिरवणुकीदिवशी खंडित वीजपुरवठ्याला तोंड द्यावे लागते. 

गडकर आळी, अनंत इंग्लिश स्कूल चौक, भवानी पेठ मंडळ, राजवाडा या मार्गावर पाच ठिकाणी वीजवाहक तारांचा अडथळा येऊ शकतो. त्याठिकाणी २३ फूट उंचीचे खांब बसवून तारांची उंची वाढवली जाईल. हे काम सुरू असून, अनंत चतुर्दशीपूर्वी ते पूर्ण होईल. 
- जितेंद्र माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सातारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2018 Ganesh Murti Transport Loadshading