सातारा जिल्‍ह्यात डॉल्बीचे विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 September 2017

सातारा - ढोल-ताशांचा अखंड गजर, कार्यकर्त्यांच्या मुखी ‘मोरया’चा जयघोष, रांगोळ्यांच्या पायघड्या अन्‌ गुलाल-फुलांच्या उधळणीत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणेशभक्तांनी अमाप उत्साहात गणरायाला निरोप दिला. पोलिसांच्या ‘शिस्ती’मुळे यंदा डॉल्बीमुक्त वातावरणात तब्बल १४ तास मिरवणूक निघाली. पारंपरिक वाद्ये व बॅंड पथकांचा वापर आणि महिलांचा मोठा सहभाग हे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. 

सातारा - ढोल-ताशांचा अखंड गजर, कार्यकर्त्यांच्या मुखी ‘मोरया’चा जयघोष, रांगोळ्यांच्या पायघड्या अन्‌ गुलाल-फुलांच्या उधळणीत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणेशभक्तांनी अमाप उत्साहात गणरायाला निरोप दिला. पोलिसांच्या ‘शिस्ती’मुळे यंदा डॉल्बीमुक्त वातावरणात तब्बल १४ तास मिरवणूक निघाली. पारंपरिक वाद्ये व बॅंड पथकांचा वापर आणि महिलांचा मोठा सहभाग हे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. 

तांदूळ आळीत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते पालिकेच्या गणपतीच्या आरतीनंतर विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, नगराध्यक्षा माधवी कदम, पालिकेचे उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्याधिकारी शंकर गोरे यावेळी प्रमुख उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालिकेच्या ‘श्री’ पाठोपाठ शिवाजी उदय मंडळाची पालखीतील मूर्ती होती. मंडळांच्या मिरवणुका विविध वाद्यांच्या गजरात राजपथावर येत होत्या. यावर्षी अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकांची जोरदार तयारी केली होती.

बहुतेक मंडळांनी आपले मिरवणुकीचे रथ फुलांनी आणि विद्युत दिव्यांनी सजविले होते. महिला व युवतींचा विसर्जन मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत उत्साहात वाढता सहभाग हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य अधोरेखित होत होते. भगवे फेटे, झेंडे, गणपती बाप्पा लिहिलेल्या पांढऱ्या टोप्यांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. काल सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आज सकाळी सव्वासात वाजता मानाच्या शंकर-पार्वती गणेशाच्या विसर्जनाने संपली. यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल १४ तास सुरू होती.

डॉल्बी नसली तरीही युवकांत उत्साह
यावर्षी डॉल्बीवर बंदी घातल्यामुळे मिरवणुकीसाठी बहुतेक मंडळांनी राज्याच्या विविध भागांतून ढोल, झांज, हलगी व बॅंड पथके आणली होती. त्यामुळे या पारंपरिक वाद्यांच्या गजराने मिरवणूक मार्गावरील वातावरण भारून गेले होते. साहजिकच डॉल्बीच्या तालावर बेधुंद नाचणारी तरुणाई हे दृष्य अभावानेही दिसले नाही. डॉल्बी नसली तरी युवकांचा उत्साह कोठेही कमी नव्हता. युवक आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘मोरया’चा जयघोष अखंड सुरू ठेवला होता.

घरगुती गणेशमूर्तींचे सकाळीच विसर्जन
अनंत चतुदर्शीदिवशी दुपारी पौर्णिमा सुरू होत असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू केले होते. बालचमूंसह कुटुंबातील सारे जण भक्तिभावाने ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणरायाला निरोप देत होते. त्यामुळे मोती तळ्यासह विसर्जनांच्या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी होती. घरगुती गणेशाचे विसर्जन करून नागरिक शहरातील मंडळांच्या मिरवणुकांचा आनंद लुटण्यासाठी राजपथावर उपस्थित होत होते. मुख्य मिरवणूक मार्गावरील गणेश मंडळांच्या मिरवणुका दुपारीच सुरू झाल्या. 

विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये
महिला व युवतींचा वाढता सहभाग सुरक्षिततेच्या दृष्टीने आश्‍वासक
ढोल, झांज, हलगी तसेच बॅंड पथकांना पुन्हा ‘अच्छे दिन’
उलट-सुलट मिरवणुकांमुळे काही वेळा मिरवणूक मार्गावर कोंडी
पोलिस, गृहरक्षक दल, पालिका कर्मचारी, वीज कर्मचाऱ्यांची चोख कामगिरी
मध्यरात्री १२ वाजता ध्वनिक्षेपक व वाद्ये झाली बंद 
पालिका तसेच भाजपतर्फे राजपथावर गणेश मंडळांसाठी स्वागत कक्ष
कृत्रिम तळ्यावर क्रेनच्या साह्याने होणारे विसर्जन पाहण्यासाठी पहाटेपर्यंत गर्दी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news no dolby in satara