esakal | भीमसेन जोशी महोत्सव शनिवारी सांगलीत
sakal

बोलून बातमी शोधा

भीमसेन जोशी महोत्सव शनिवारी सांगलीत

सांगली - स्वरवसंत ट्रस्टतर्फे आयोजित चौथा स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव शनिवारी (ता. 13) होत आहे. सकाळी साडेआठ ते दुपारी एक आणि साडेचार ते रात्री दहा अशा दोन सत्रांत सांगलीत भावे नाट्यमंदिरात मेळावा होईल.

भीमसेन जोशी महोत्सव शनिवारी सांगलीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली - स्वरवसंत ट्रस्टतर्फे आयोजित चौथा स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव शनिवारी (ता. 13) होत आहे. सकाळी साडेआठ ते दुपारी एक आणि साडेचार ते रात्री दहा अशा दोन सत्रांत सांगलीत भावे नाट्यमंदिरात मेळावा होईल. संयोजक बाळासाहेब कुलकर्णी व प्रसिद्ध हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

सांगलीकरांसाठी दर्जेदार संगीत, गायन आणि वादनाची मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवात यंदाही मान्यवर कलावंतांची हजेरी आहे. पंडित संजीव अभ्यंकर, अश्‍विनी देशपांडे यांची जसरंगी जुगलबंदी हा यंदाच्या महोत्सवाचा "मास्टर पीस' असेल. 

संगीतातील प्रदीर्घ योगदानाबद्दल बंगळूर येथील पंडित रवींद्र काटोटी यांना वसंतराव गुरव संवादिनी वादक स्मृती पुरस्कार व पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर 50 वर्षांहून अधिक काळ टाळवादक म्हणून साथसंगत केलेले 89 वर्षीय माऊली टाकळकर यांचाही विशेष सत्कार होणार आहे. 

पहिल्या सत्रास सकाळी साडेआठला प्रारंभ होईल. त्यात सांगलीचे प्रसिद्ध सतारवादक रफीक नदाफ व त्यांचे पुत्र शफात नदाफ यांच्या सहवादनाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. त्यानंतर संदीप रानडे यांचे गायन, पंडित काटोटी यांचे एकल हार्मोनियम वादन होईल. दुसऱ्या सत्रास दुपारी चारला सुरवात होईल. त्यात मुंबईचे मानसकुमार यांचे व्हायोलीन वादन, जागतिक कीर्तीचे बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन, नंतर पंडित संजीव अभ्यंकर व विदुषी अश्‍विनी देशपांडे यांच्या जसरंगी जुगलबंदीने कार्यक्रमाची सांगता होईल. 

या वेळी रोहित मुजुमदार, अजिंक्‍य जोशी, यशवंत वैष्णव, महेश देसाई यांची तबलासाथ; तर सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकर्णी हार्मोनियमवर साथसंगत करणार आहेत. ध्वनिव्यवस्था शरद शहा, तर पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात 25 वर्षांहून अधिक काळ निवेदन केलेले आनंद देशमुख महोत्सवासाठी उपलब्ध असतील. त्यांच्याबरोबर विजय कडणे व ऊर्मिला ताम्हणकर हे स्थानिक निवेदक असतील. 

या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका सांगलीत हनुमान हॉटेल (विश्रामबाग), बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सिव्हिल हॉस्पिटल चौक, राजवाडा चौक, विश्रामबाग व मिरज या शाखांमध्ये, तसेच गावभागात के. पी. ट्रेडर्स येथे उपलब्ध आहेत. रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा. 

loading image