
कोल्हापूर - ‘मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर प्रश्नांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्यावर लगेच विश्वास बसणार नाही. म्हणूनच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा रोखठोक इशारा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी दिला.
कोल्हापूर - ‘मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर प्रश्नांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्यावर लगेच विश्वास बसणार नाही. म्हणूनच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा रोखठोक इशारा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी दिला.
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा समाजाचे प्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू महाराज म्हणाले, ‘‘गेल्या १५ दिवसांपासून मराठा समाजाचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सर्व समाजाने पाठिंबा दिला आहे. असे असताना आरक्षण देण्यात काय अडचणी आहेत समजत नाही. त्यामुळे समाजाने ९ ऑगस्टला बंद पुकारला असून बंद शांततेत पार पडेल’’.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाजाचा राज्य सरकारवर विश्वास राहिलेला नाही. मराठा आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न असफल झाल्यावर शांततेत आंदोलन करणाऱ्या डॉक्टर, वकील, प्राध्यापक व युवक कार्यकर्त्यांना पोलिस नोटीस पाठवत आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिस दडपशाही का करता? ’’
यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, धनंजय सावंत, प्रसाद जाधव, सागर धनवडे (नृसिंहवाडी) यांनी गुरुवारचा बंद शांततेत राहील, अशी ग्वाही
प्रशासनाला दिली.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कोल्हापूरची माणसे ही रांगडी असून, दिलेले शब्द पाळतात. त्यामुळे नऊ ऑगस्टचा बंद शांततेत पाळावा, असे आवाहन केले. करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आभार मानले.
आंदोलनकर्त्यांवर मंत्री दबाव आणत असून, पोलिसांच्या माध्यमातून मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आंदोलन शांततेत सुरू असताना अशा प्रकारे सरकार जर आंदोलकांवर दबाव टाकत असेल, तर ते खपवून घेणार नाही. पोलिसांनी बळाचा वापर केला तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील.’’
- दिलीप देसाई