Maratha Kranti Morcha : आरक्षण मिळेपर्यंत कोल्हापूरात ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा पहिला टप्पा झाला. आजपासून दुसरा टप्पा सुरू होणार असून, तो मात्र आक्रमक असेल. तसेच दसरा चौकातील ठिय्या आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील, अशी माहिती सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा पहिला टप्पा झाला. आजपासून दुसरा टप्पा सुरू होणार असून, तो मात्र आक्रमक असेल. तसेच दसरा चौकातील ठिय्या आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील, अशी माहिती सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत दिली.

मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढू लागली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली आहे. पण ती मान्य नाही, आरक्षण कसे मिळवायचे, हे आम्हाला ठाऊक आहे. आरक्षण घेण्यासाठी समन्वयक मंत्रालयावर धडक देतील, असा इशारा दिला.

काल दसरा चौकात लाखो मराठा उपस्थित होते. अत्यंत शांततेत ते मोर्चात सहभागी झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिवसभर घरी होते; मात्र ते आंदोलनस्थळी आले नाहीत. तेथून ते पोलिसांवर दबाव आणत होते, असा आरोप केला.

पत्रकार परिषदेस दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, वसंतराव मुळीक, उमेश पवार, संदीप पाटील, गणी आजरेकर, राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील यांची किंमत शून्य
मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे, मात्र या प्रश्‍नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील काहीच भूमिका घेताना दिसत नाहीत, अशी विचारणा केली असता, मराठा आंदोलकांच्या लेखी पालकमंत्र्यांची किंमत शून्य असल्याचा टोला संयोजकांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत २३ बंधू-भगिनींनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र राज्याचे संवेदनहीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना श्रद्धांजली वाहिली, ना दु:ख व्यक्‍त केले. यावरून मराठा समाजाबद्दलच्या त्यांच्या भावना स्पष्ट होतात. म्हणूनच अशा संवेदनहीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत केली.

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा पेटला आहे. सर्व राज्यात अस्वस्थता पसरली आहे. आरक्षण देण्याची घोषणा करूनही शासनाने हा प्रश्‍न मार्गी लावलेला नाही. त्यामुळे संपूर्ण समाजात अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच राज्यातील २३ मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे पाच वाजता ट्विट करून दु:ख व्यक्‍त केले; मात्र आज राज्यातील २३ मराठा बांधवांनी आत्महत्या करूनही मुख्यमंत्र्यांना जाग आलेली नाही. ते संवेदनहीन मुख्यमंत्री आहेत. या २३ लोकांच्या मृत्यूची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. ते आणखी थोडा काळ मुख्यमंत्री राहिले तर आणखी आत्महत्या वाढतील. म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha agitation in Kolhapur