Maratha Kranti Morcha: कोल्हापूरचा आदर्श

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

कोल्हापूर - राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा घेऊन कोल्हापूरची वाटचाल सुरू आहे. राज्यासमोर आदर्श ठेवताना सनदशीर मार्गाने सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला बंद यशस्वी केला. शाहूंच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली.

कोल्हापूर - राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा घेऊन कोल्हापूरची वाटचाल सुरू आहे. राज्यासमोर आदर्श ठेवताना सनदशीर मार्गाने सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला बंद यशस्वी केला. शाहूंच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली. दसरा चौकातील मुख्य आंदोलनास सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी उपस्थिती लावून पुरोगामी कोल्हापूरची ओळख आणखी ठळक केली.

ऐतिहासिक दसरा चौकात लाखो मराठा बांधव एकवटले. तेथे सरकारवर टीका-टिप्पणी झाली; मात्र कोणत्याही पातळीवर, कोणीही संयम ढळू दिला नाही. त्याबाबतच्या बैठका झाल्या. त्याही मुस्लिम बोर्डिंगमध्ये आणि आजच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळे समाजाचे कार्यकर्तेही एकवटले.

चळवळीच्या या शहराने राजर्षी शाहू महाराजांच्या समतेचा विचार प्रत्यक्षात उतरवताना आंदोलनाला वेगळे वळण लागू नये याची काळजी घेतली.शहरात कामगारांसाठी मोर्चा काढताना आंदोलनकर्त्यांनी घरातून भाजी-भाकरी आणली. स्वस्त धान्य दुकानातील गैरव्यवहार रोखण्यासाठी एकजूट केल्यानंतर राज्यातील वितरण व्यवस्था बदलली. टोल आंदोलनाच्या ठिणगीने राज्यातील टोल वसुलीविरुद्धचा वणवा पेटला.

चळवळीची ही परंपरा पुढे नेताना गेले सोळा दिवस दसरा चौकात मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू राहिले. त्यासाठी नेते, विविध समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. सर्व जाती-धर्मातील लोकांनी खांद्याला खांदा लावून शांतता राखण्यासाठी  प्रयत्न केले. राज्यात इतरत्र पडसाद उमटत असताना आपला सनदशीर बाणा सोडला नाही. बंदच्या मुख्य दिवशी दसरा चौकात आंदोलनस्थळी उपस्थितांसाठी मुस्लिम बोर्डींगच्या वतीने जेवणाची व्यवस्था केली. विविध संस्था व संघटनांनी आलेल्यांना गूळ-पाणी दिले, पाणी वाटप केले. परिसराची स्वच्छताही केली. दसरा चौकात आंदोलनासाठी सहकुटुंब आलेल्यांना परिसरातील हॉटेल, दुकानदारांनी सुविधा देऊ केल्या. महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली. मुख्य कार्यक्रमानंतर प्रत्येक आंदोलनकर्ता सुखरूप घरी पोचेल याची काळजी घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Kolhapur Bandh