
कडकडीत बंद, महामार्ग सुन्न, रास्ता रोको, मुंडण अन् तळपता मराठा
कडकडीत बंद, महामार्ग सुन्न, रास्ता रोको, मुंडण अन् तळपता मराठा
सातारा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांनी आज पुन्हा एकदा क्रांती घडविली. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये जिल्ह्यावासीय उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतही कडकडीत बंद राहिला. पेटलेल्या मराठ्यांनी आज ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’ केला. मराठा बांधवांच्या मागण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांनीच दिल्याने राष्ट्रीय महामार्गही सुन्न झाला. कोणी मुंडण केले, जनावरे रस्त्यावर बांधली, पोवडे, देशभक्तिपर गीते म्हटली तर कोणी ठिय्या मारला. शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत तळपत्या मराठ्यांनी आज आणखी एकदा समाजातील एकजुटीची ताकद सिद्ध केली.
मराठ्यांचा सुप्त उद्रेक
नुकतेच आक्रमक आंदोलन केलेल्या मराठा समाजाने संयमाची भूमिका घेतली असली तरी आजचा बंद म्हणजे मराठ्यांचा सुप्त उद्रेकच ठरला. नेतृत्वाशिवाय मराठा ताकदवान आहे, ही चुणूक दाखविणारा संप यशस्वी करून सुप्त उद्रेक दाखवून दिला. त्यातही पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका (कऱ्हाड) येथे तसेच तासवडे (ता. कऱ्हाड) टोलनाक्यावर मराठा आंदोलकांनी भजन, कीर्तन करत काही काळ महामार्ग रोखून धरला.
कऱ्हाड-पंढरपूर रस्त्यावर सदाशिवनगर (ता. कऱ्हाड) येथे रास्ता रोको केला. केळघर (ता. जावळी), नरवणे (ता. माण) येथे टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदविला. वडूजमध्ये (ता. खटाव) कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बाजारपेठांना ‘विश्रांती’
अव्याहतपणे सुरू असलेल्या जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांनी महाराष्ट्र बंदमुळे ‘विश्रांती’ घेतली. सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई या शहरांसह जिल्ह्यातील इतर शहरे, एव्हाना गावोगावच्या बाजारपेठाही बंद राहिल्या. सकाळपासून कोणीच दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे जिल्हाभर कमालीची शांतता पसरली. जिल्ह्याची बाजारपेठ असलेल्या साताऱ्यात कडकडीत बंद होता. पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी येथेही बंद पाळण्यात आल्याने पर्यटनस्थळावर शुकशुकाट पसरला. रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे आठवडा बाजार असूनही कडकडीत बंद पाळण्यात आला.
एसटीची चाके जागेवर
मराठा आंदोलनाचे यापूर्वीचे रौद्ररूप पाहिलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आज संयमी भूमिका घेत एसटी वाहतूक बंद ठेवली. राज्यभरासह सातारा जिल्ह्यात सकाळपासून सायंकाळपर्यंत एकही बस धावली नाही. त्यामुळे नेहमी आंदोलनाची शिकार होणाऱ्या एसटी बस दुपारपर्यंत सुखरूप राहिल्या. या संप काळात सुमारे ६० ते ७० लाखांचे एसटी महामंडळाचे नुकसान झाले.
पोवाडे, भजन, कीर्तन
जिल्हाभरातील वातावरण दिवसभर मराठा आंदोलकांनी दणाणून सोडले. ‘कोण म्हणंतय देत नायं, घेतल्याशिवाय राहत नाय, एक मराठा, लाख मराठा, रक्तारक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ, जय शिवाजी, हर हर महादेव’ आदी घोषणांनी वातावरण तापू निघाले. ठिकठिकाणी पोवाडे, देशभक्तिपर गीते, भजन, कीर्तन सुरू केले. दरम्यान, मेढा येथे ठिय्या आंदोलन सुरू असतानाही रुग्णवाहिका तेथे आली. आंदोलकांनी सामाजिक भान दाखवत तत्काळ रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.
शाळा ‘सुटी’वर
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थितीचा अंदाज बांधून सर्व शाळांना सुटी देण्याविषयी संबंधित प्रशासनाला आदेश दिले होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शाळा बंदचा निर्णय संबंधित संस्थांवरच सोपविला होता. मात्र, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सर्वच शाळा व्यवस्थापनांनी शाळा, महाविद्यालये बंद ठेवली.
शासनाचे घातले श्राद्ध
कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावर आंदोलकांनी सामुदायिक मुंडण केले. जावळीतील हजारो मराठ्यांनी मेढ्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. काही आंदोलकांनी मुंडण करून शासनाचे श्राद्ध घातले.
...काय घडले जिल्ह्यात
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, बाजारपेठ उत्स्फूर्त बंद, एसटी बंद
कऱ्हाड : महामार्ग रोखला, सामुदायिक मुंडण, दुचाकी, चारचाकी रॅली, सदाशिवगडमध्ये रास्ता रोको
कोरेगाव : आरक्षणासाठी बळी दिलेल्यांना श्रद्धांजली, बाजारपेठ थांबली, रहिमतपूरचा आठवडी बाजार बंद
जावळी : मेढ्यात ठिय्या, तहसील कचेरीवर मोर्चा, मुंडण, कुडाळला बैलगाडीतून रॅली
खंडाळा : मोर्चा, शुकशुकाट, बाजारपेठ बंद, रॅली
खटाव : वडूजला बंद, कातरखटावमध्ये मोर्चा, गावोगावी शुकशुकाट, ठिय्या आंदोलन,
माण : दहिवडीत ठिय्या, बाजारपेठ बंद, इंजबावमध्ये मोर्चा, दिवडला बंद
पाटण : पाटणमध्ये मोर्चा, ठिय्या आंदोलन, तारळेत बाजारपेठ बंद
वाई : उत्स्फूर्त बंद, दुचाकी रॅली, ढोलांचा निनाद, वडाप वाहनेही थांबली, मांढरदेवी-भोर रस्त्यावर रास्ता रोको
फलटण : बाजारपेठेत शांतता, ठिय्या आंदोलन
महाबळेश्वर : बाजारपेठ सुरू, रॅली काढून तहसीलदारांना निवेदन, पाचगणीत बाजारपेठ बंद