Maratha Kranti Morcha: पंढरपूर तहसीलवर गाढव मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

पंढरपूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणप्रश्नी सरकारला जागे करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोडमार्गे निघालेल्या मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक मारली. या वेळी सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला. महिलांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले. त्यानंतर अनेक महिलांनी आरक्षणाची मागणी करत सरकारच्या वेळकाढू धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, येथील तहसील कार्यालयासमोर सात दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज सायंकाळी समारोप झाला. दुपारी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. सात दिवसांपासून आंदोलनस्थळी अन्नदान केले जात होते. आज येथील काही मुस्लिम समाजातील तरुणांनी अन्नदान करून सामाजिक समतेचा संदेश दिला.

रक्तदान करून निषेध
आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. आज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रक्तदान करून सरकारचा निषेध केला. तहसील कार्यालयाजवळ सुरू असलेल्या आंदोलनस्थळी सकाळपासून रक्तदानासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दिवसभरात शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आरक्षण मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation Donkey Rally