esakal | आरक्षणासाठी सोलापुरात जागरण गोंधळ; आजी, माजी नेत्यांनी उपस्थित राहून दिला पाठिंबा 
sakal

बोलून बातमी शोधा

MarathaKrantiMorcha Jagran Gondhal in Solapur for maratha reservation

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार भारत भालके यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जागरण गोंधळास भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला. 

आरक्षणासाठी सोलापुरात जागरण गोंधळ; आजी, माजी नेत्यांनी उपस्थित राहून दिला पाठिंबा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर : आरक्षणासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ग्रामदेवी रुपाभवानी मंदिर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जागरण गोंधळ करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार भारत भालके यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जागरण गोंधळास भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला. 

आमदार भारत भालके, माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते रुपाभवानी देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर जागरण गोंधळास सुरवात झाली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे, पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, किरण पवार, श्रीकांत घाडगे, महेश सावंत, विक्रांत वानकर, अमोल शिंदे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने सकाळपासूनच समाज बांधवांनी रुपाभवानी मंदिर परिसरात गर्दी केली होती. आमदार भारत भालके यांनी आपल्या भाषणात सरकारला धारेवर धरले. मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला सळो की पळो करून सोडण्याची तयारी केली आहे. सरकारला उपाशी ठेवायचे, आपण उपाशी रहायचे नाही. आपण त्रास करून घ्यायचा नाही. बंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू देवू नका. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सरकारला भांडू असेही त्यांनी सांगितले. 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही दुपारी जागरण गोंधळ कार्यक्रमास भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला. आरक्षणाचा प्रश्‍न सरकारने तातडीने सोडवावा अशी भूमिका त्यांनी मांडली. नगरसेविका फिरदोस पटेल, सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण यांनी मुस्लिम बांधवासह जागरण गोंधळ कार्यक्रमास उपस्थित राहून आंदोलनास जाहीर पाठींबा दिला. कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. दिवसभरात अनेक राजकीय नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जागरण गोंधळ कार्यक्रमास भेटी देवून पाठिंबा दिला. जागरण गोंधळाच्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात केला होता. 

आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही मराठा समाजासोबत आहोत. हा समाज स्वाभीमानी आहे, आरक्षणाचा प्रश्‍न सरकारने तातडीने सोडवावा. मराठा समाज बांधवांनी आपले आंदोलन शांततेत करावे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची आधीपासून भूमिका आहे. 
- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री 

मराठा समाजासोबत धनगर समाज, मुस्लिम बांधवांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. दिलेले आश्वासन सरकारने पाळावे. यापुढे जे प्रामाणिक आहेत त्यांना लोक निवडून देतील. या सरकारला सोळो की पळू करु. आरक्षणाच्या मागणीसाठी कोणीही आत्महत्या करु नये. या प्रश्‍नांवर आम्ही सर्व आमदार राज्यपालांना भेटणार आहोत. 
- भारत भालके, आमदार