#MarathaKrantiMocha गुन्हे ९ ऑगस्टपर्यंत मागे घ्या - प्रवीण गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 August 2018

कोल्हापूर - ‘मराठा समाजाचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. त्यातही कोल्हापूरच्या आंदोलनाने राज्याला आदर्श दिला. दहा हजार आंदोलक तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून ते ९ ऑगस्टपर्यंत मागे न घेतल्यास वातावरण आणखी चिघळेल. शांततेच्या मार्गानेच आंदोलन यशस्वी करू या,’ असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले.

गेल्या काही दिवसांपासून श्री. गायकवाड यांचा राज्याचा दौरा सुरू असून त्यांनी येथील आंदोलनाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, ‘‘एकूण झालेल्या ५८ मोर्चांमध्ये कोल्हापूरने आदर्श दिला आहे. सध्या सुरू असलेले आंदोलनही सनदशीर मार्गानेच सुरू असून त्याचेही राज्यातील समाजबांधवांनी अनुकरण केले पाहिजे. ९ ऑगस्टपर्यंत आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढणार 
असून, शांततेच्या मार्गानेच आंदोलन सुरू राहील. मात्र, शासन कोम्बिंग ऑपरेशन कशासाठी करते आहे? त्यामुळे आणखी संतप्त प्रतिक्रियाउमटू लागल्या आहेत.’’

एकीकडे आंदोलन तीव्र होत आहे आणि त्याचवेळी मराठा समाजाची जाणीवपूर्वक नाहक बदनामी सुरू झाली आहे. आजवर ११ मराठा मुख्यमंत्री झाले. त्यांनी काय केले?, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो आहे. मात्र, त्यांच्या काळात महाराष्ट्र राज्य देशात नंबर वन राहिले. त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात सहकार रुजविला.

शिक्षणावर अधिक भर दिला. खासगी शिक्षण संस्थांची स्थापना केली. त्यामुळे समाजाचा आर्थिक व शैक्षणिक विकास झाला, याबाबत चर्चा का होत नाही? घटनादुरुस्तीने आरक्षण शक्‍य आहे आणि आजवर अशा १२३ दुरुस्त्या झाल्या आहेत. आर्थिक निकषाचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी त्यानुसार आरक्षण शक्‍य नाही. कारण घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच असे आरक्षण नाकारले होते. कारण तसे झाल्यास श्रीमंत व गरीब अशी दरी आणखी वाढणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, हिंदूराव हुजरे-पाटील, बाबा महाडिक आदी या वेळी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pravin Gayakwad comment on Maratha Reservation agitation