हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाईचा पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 September 2017

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांवर पावसाचे सावट राहिले असले तरी अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. आता पावसाने उघडीप दिल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. रात्री पालखी सोहळ्याला हजारो कोल्हापूरकरांनी उपस्थिती लावली. आता शनिवार-रविवार सलग सुट्या आल्याने गर्दीचा उच्चांक वाढणार असून, देवस्थान समिती व प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे.

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांवर पावसाचे सावट राहिले असले तरी अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. आता पावसाने उघडीप दिल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. रात्री पालखी सोहळ्याला हजारो कोल्हापूरकरांनी उपस्थिती लावली. आता शनिवार-रविवार सलग सुट्या आल्याने गर्दीचा उच्चांक वाढणार असून, देवस्थान समिती व प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे.

दरम्यान, श्री अंबाबाईची दशभुजा महाकाली रूपात सालंकृत पूजा बांधली. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात देवीची वनविहार रूपात पूजा बांधण्यात आली. उत्सव काळात विविध संस्था आणि संघटनांनी सेवाभावी उपक्रमावर भर दिला असून, मंदिर परिसराची स्वच्छता, भाविकांना पिण्याचे पाणी पुरवण्यावर त्यांचा भर आहे. 

शुक्रवार देवीचा वार असल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी रांगा लावल्या. रात्री पालखीवेळी तर गर्दीने उच्चांक गाठला. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आरती जाधव यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवात भाविकांची संख्या पंचवीस लाखांवर पोचते. त्यामुळे प्रसादालाही मोठी मागणी असते. या पार्श्‍वभूमीवर देवस्थान समितीतर्फे दोन लाख लाडूंचे नियोजन केले आहे. कळंबा कारागृहातील बंदिजनांकडून हे लाडू तयार करून घेतले जाणार आहेत. स्वाईन फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान समितीकडून दर्शन रांग परिसरात वेगळ्या पद्धतीचे सहा मिश फॅन बसवले आहेत. 

अष्टादशभुजा अंबाबाई रूपात सालंकृत पूजा
दुर्गासप्तशतीमधील मध्यम चरित्राची नायिका म्हणजे अष्टादशभुजा अंबाबाई. इथे महिषासुरमर्दिनीलाच अंबाबाई म्हटले आहे. अष्टादश म्हणजेच अठरा हातांनीयुक्त अशी ही देवीच या ग्रंथाची प्रधान नायिका आहे. सर्व देवतांच्या अंशांनी युक्त असे तिचे वर्णन आढळते. ही देवता म्हणजे सिंहवाहिनी दुर्गाच. दुर्गासप्तशती ग्रंथानुसार महिषासुराचा वध करण्यासाठी विविध देवतांनी आत्मतेजापासून हिची निर्मिती केली. महिषासुराचा वध हा फक्त स्त्रीच्याच हातून होणार, असा त्याला वर असल्याने देवतांनी आत्मशक्तीचे आवाहन केले. त्याप्रमाणे आत्मशक्तीने अष्टादशभुजा देवीचे स्वरूप धारण केले. नंतर देवीने महिषाचा वध करून तिन्ही लोक स्वस्थ केले. याही देवतेचे विस्तृत चरित्र देवीभागवत ग्रंथामध्ये मिळते. दुर्गा सप्तशती ग्रंथानुसार

देवीच्या अठरा हातांमध्ये - अक्षमाला, परशू, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, कमंडलू, कालदंड, शक्ती, खड्‌ग, ढाल, शंख, घंटा, पानपात्र, शूल, पाश आणि चक्र अशी आयुधे आहेत. देवीचा रंग पोवळ्यामाणे तांबडा कल्पिला आहे. तिचे मुख धवल तर तिचे हात निळे कल्पिले आहेत. यामागचे कारण असे, की ही देवता ब्रह्मा-विष्णू-महेश तत्त्वांनी युक्त असल्याचे सूचित करायचे आहे. त्यामुळेच अंबाबाईला त्रिगुणात्मिका आणि आदिजननी म्हटले जात असावे. वणी (सप्तशृंगी) या क्षेत्री असलेली जी देवी आहे, ती ही अष्टादशभुजा अंबाबाईच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news ambabai palakhi