अंबाबाईची शृंगेरी शारदांबा रूपात सालंकृत पूजा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नवरात्राच्या सहाव्या मंगळवारी शृंगेरी शारदांबा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री पुजक माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली.

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नवरात्राच्या सहाव्या मंगळवारी शृंगेरी शारदांबा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री पुजक माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली. त्यांना रवी माईनकर यांनी सहाय्य केले.

व्हिडीओ - नितीन जाधव

शृंगेरी शारदाम्बा : 
शंकराचार्य परंपरेमध्ये शारदाम्बेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदा म्हणजेच सरस्वती. ज्ञानाची, विद्येची देवता. परंपरेप्रमाणे असे सांगितले जाते की, प्रथमत: शंकराचार्यांनी शृंगेरी क्षेत्राचे महत्त्व जाणून भगवती शारदेच्या आज्ञेप्रमाणे या देवतेची चंदनाची मूर्ती घडवून ती विद्यमान स्थानी श्रीचक्रावर स्थापन केली.

याबाबत अशी कथा सांगितली जाते की, शृंगेरी या क्षेत्री आदि शंकराचार्यांना भर दुपारी बेडकाच्या मस्तकावर नाग आपल्या फण्याचे छत्र धरुन आहे असे दिसले. त्यामुळे हे क्षेत्र अनन्यसाधारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कालांतराने परकीय आक्रमणात चंदनाच्या मूर्तीला क्षती पोहोचल्यावर विजयनगर साम्राज्यात विद्यारण्यस्वामींनी आई शारदाम्बेचा सुवर्णविग्रह स्थापन केला अशी पारंपारिक माहिती आपल्याला या पीठाबद्दल मिळते. शृंगेरी शारदा पीठ हे शंकराचार्य पीठांमध्ये दक्षिणाम्नाय पीठ आहे. देवतेचे स्वरुप असे - वरदहस्त, अक्षमाला, अमृतकुंभ आणि पुस्तक. देवीच्या हातावर पोपट बसलेला दाखवला जातो. हा ज्ञानाचे प्रतीक आहे. देवीच्या हातातील अक्षमाला तपाचे, तर पुस्तक हे विद्येचे प्रतीक आहेत. अमृतकुंभ हे ज्ञानप्राप्ती हेच अमरत्व या तत्वज्ञानाचे द्योतक आहे. देवीच्या मस्तकावर चंद्रकोर आहे जी तीचे अध्यात्ममार्गातील महत्त्व दर्शवते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news ambabai puja

टॅग्स