कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दीड लाखावर भाविक

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दीड लाखावर भाविक

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी दिवसभरात दीड लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. पूर्व दरवाजातून बत्तीस हजारांवर, पश्‍चिम दरवाजातून ४१ हजारांवर, दक्षिण दरवाजातून ५८ हजारांवर, तर उत्तर दरवाजातून २१ हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची अधिकृत माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिली.

दरम्यान, श्री अंबाबाईची अष्टदशभुजा महालक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर, रवी माईनकर यांनी पूजा बांधली. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात देवीची अश्‍वारूढ पूजा बांधण्यात आली. 

अष्टभुजा महासरस्वती रूपात आज श्री अंबाबाईची पूजा
दुर्गासप्तशतीमधील उत्तम चरित्राची नायिका म्हणजे महासरस्वती. हिचे नाव महासरस्वती असले तरी ही दुर्गेचेच एक स्वरूप असल्याचे दिसून येते. पार्वतीच्या शरीरकोशापासून निर्माण झाली अशी कथा असल्याने कौशिकी हे या देवतेचे दुसरे नाव. या देवतेचा युद्धप्रसंग अधिक भीषण पद्धतीने मांडल्याचे आढळते. शुंभ-निशुंभ या असुरांच्या नाशासाठी महासरस्वती या स्वरूपाचा आविर्भाव झाल्याची कथा आहे. तिने शुंभ-निशुंभांच्या धूम्रलोचन नामक दूताला नुसत्या हुंकाराने भस्मसात केले, तर आपल्या भ्रुकुटीपासून काली निर्माण करून चंड-मुंड या राक्षसांचा नि:पात घडवला. त्यामुळे तिला चामुंडाही नाव प्राप्त झाले. कौशिकीची कथा अधिक विस्तृत स्वरूपात देवीभागवत ग्रंथामध्ये येते. उत्तम चरित्रानुसार या देवतेच्या पराक्रमामध्ये विविध देवांची स्त्रीरूपेही सहाय्यकर्ती झाली, जसे ब्रह्माणी, कौमारी, वैष्णवी, माहेश्‍वरी आदी ज्यांना मातृका असे म्हटले जाते.

चित्पावन संघातर्फे अष्टमी जागर
कोल्हापूर चित्पावन संघाच्या वतीने श्री अंबाबाईचा अष्टमी जागर सोहळा होणार आहे. बुधवारी (ता. २७) लक्ष्मी मंगल कार्यालयात धार्मिक विधी होतील. सायंकाळी साडेसात ते रात्री बारापर्यंत घागर फुंकण्याचा कार्यक्रम होईल, याबाबतचे निवेदन संस्थेचे कार्यवाह द. गो. कानिटकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

मोफत वैद्यकीय उपचार 
मंदिर परिसरात घाटी दरवाजा आणि विद्यापीठ हायस्कूल चौकात दोन ठिकाणी मोफत वैद्यकीय सुविधा केंद्रे उभारली आहेत. गेल्या तीन दिवसांत येथे सुमारे चारशे रुग्णांवर प्राथमिक उपचार झाले. तीन दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडला नसून, केवळ चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे, अशाच पद्धतीच्या तक्रारी घेऊन भाविक केंद्रात आले. व्हाईट आर्मी, सीपीआर, ॲस्टर आधार हॉस्पिटल, ॲपल सरस्वती हॉस्पिटल, महापालिका आरोग्य विभाग, हक्कदार श्रीपूजक मंडळ, रोटरी क्‍लब ऑफ मिडटाऊन, जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन आदी संस्थांतर्फे ही सुविधा उपलब्ध केली आहे.

अवतरली अस्सल मराठमोळी संस्कृती

भवानी मंडपातील मंचावर अस्सल मराठमोळी संस्कृती अवतरली. विविध गीते आणि नृत्याविष्कारांनी सजलेल्या या ‘मराठी पाऊल पडते पुढे...’ कार्यक्रमाने साऱ्यांचीच मने जिंकली. निमित्त होते पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे. मुंबईच्या कलारंजना वाद्यवृंदाने हा कार्यक्रम सादर केला. भूपाळीपासून भैरवीपर्यंत विविध कलाविष्कार कार्यक्रमातून सादर झाले. गोंधळ, वाघ्यामुरळी, शेतकरी गीतांसह अठरापगड जातींच्या महाराष्ट्रातील विविध मराठी लोककलांचा आविष्कारच यानिमित्ताने साऱ्यांना अनुभवायला मिळाला. 

२१ फुटी अंबाबाई मूर्ती दर्शनासाठी खुली
गुजरी कॉर्नर येथील शिवप्रेमी आझाद तरुण मंडळाची एकवीस फुटी दुर्गामातेची मूर्ती आजपासून दर्शनासाठी खुली झाली. वागेश्‍वरी रूपातील ही मूर्ती मूर्तिकार ऋषीकेश उत्तम निगवेकर यांनी साकारली आहे. मंडळाचे उत्सवाचे यंदाचे एकतीसावे वर्ष आहे. उत्सवातील नगरप्रदक्षिणेच्या सोहळ्याची तयारी आता सुरू झाली आहे. गुजरी परिसरात विद्युतरोषणाईच्या कामाला प्रारंभ झाला.

अभिनेता चेतन दळवींची सपत्नीक भेट
श्री करवीर निवासिनी महाचंडी यज्ञ समितीच्या वतीने विश्‍वशांतीच्या संकल्पासह सुरू असलेल्या यज्ञाच्या कार्यक्रमाला आज अभिनेते चेतन दळवी यांनी सपत्नीक भेट दिली. या वेळी त्यांनी २१ फुटी अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन घेतले. या वेळी पाचशे महिलांच्या उपस्थितीत कुंकुमार्चन कार्यक्रम झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com