मैत्रिणींनो, चला स्वच्छतेचा जागर मांडूया..! - संयोगिताराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर. यंदाच्या उत्सवात आपापल्या परिसरात स्वच्छतेचा जागर मांडूया आणि साऱ्या मिळून स्वच्छ कोल्हापूरचे स्वप्न साकारूया, असे आवाहन आज युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी येथे केले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ऐतिहासिक भवानी मंडपात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्याच्या उद्‌घाटनावेळी त्या बोलत होत्या. महापौर हसीना फरास अध्यक्षस्थानी होत्या.

दरम्यान, ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ या चित्रफितीने सांस्कृतिक उत्सवाचा प्रारंभ झाला. भवानी मंडपात रोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याची ठिणगी ज्या ऐतिहासिक ठिकाणावरून पेटली, त्याच ऐतिहासिक भवानी मंडपातील हा उत्सव पुढील वर्षीपासून भव्य प्रमाणात साजरा होईल, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. खजानीस वैशाली क्षीरसागर यांनीही महिलांना शुभेच्छा दिल्या.  

भरतनाट्यम्‌ नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘पुष्पांजली’ व त्यानंतर देवीस्तुती नृत्याविष्कार सादर केला. त्यानंतर युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले. स्थानिक ७० हून अधिक महिलांच्या युगनिर्माती राजमाता जिजाऊ कार्यक्रमातून राष्ट्रप्रेमाची चेतना जागवली गेली; तर शंभूराजे मर्दानी खेळ विकास संस्थेच्या मावळ्यांनी चित्तथरारक शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. सचिन दाभाडे यांच्या हलगीवादनाने या कार्यक्रमाची उंची वाढली. 
उद्‌घाटन समारंभाला देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, शिवाजीराव जाधव, नगरसेवक अशोक जाधव, सहसचिव शिवाजी साळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पंडित कंदले, मोनिका जाजू (इचलकरंजी) यांचे निवेदन होते. 

महिलांसाठी सेल्फी पॉईंट
भवानी मंडपात महिलांसाठी सेल्फी पॉईंट उभारला असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news navratri festival in bhavani mandap