मनाला नवी उमेद देणारा नृसिंहवाडीचा दसरा

दत्तात्रय भानुदास पुजारी (राजोपाध्ये)
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात धार्मिक व पारंपरिक पद्धतीने शनिवारी(ता. ३०) साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी तथा दसरा सणाविषयी...

गुरूपौर्णिमेच्या उत्सवानंतर चातुर्मासानिमित्त बंद असलेल्या येथील दत्त मंदिरातील नित्यपालखी सोहळा दसऱ्याच्या सीमोल्लंघनाने पूर्ववत सुरू होतो. सवाद्य मिरवणुकीने व दिगंबराच्या जयघोषात दत्तगुरूंची पालखी संगमस्थळी नेण्यात येते. तेथे संकल्पपूर्वक आपट्याच्या (सोन्याच्या) पानांची पूजा होते व ‘गुरुदेव दत्त’च्या गजरात सोने लुटले जाते.

नवरात्रीचा उत्सव आणि त्यानंतर येणारा दसरा या दोन्ही उत्सवाचे मूळ स्वरूप पाहताना प्रथम देवीच्या आध्यात्मिक रूपाची जाणीव करून घेणे महत्त्वाचे आहे. देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत. तर दुर्गा, काली, भैरवी, चामुंडा, रक्‍तदंतिका ही तिची उग्ररूपे आहेत. दुर्गेच्या रूपात सिंहारूढ महिषासूर मर्दिनी आहे. कालीच्या रूपात ती सर्पवेष्टित आहे, महामायेच्या रूपात ती मोहजालात मनुष्याला अडकवते. वैकुंठात महालक्ष्मी, भूलोकात राधिका, शिवलोकात पार्वती, ब्रह्मलोकात सरस्वती या स्वरूपात तीच देवी नांदते. दुर्गा ही संपूर्ण शक्‍ती सामर्थ्याचे रूप आहे. दैवी रूपात ती असुरांचा आणि आध्यात्मिक रूपात ती अज्ञानाचा नाश करते.

भारतीय संस्कृती ही वीरतेची पूजा करणारी संस्कृती आहे. व्यक्‍ती आणि समाज यांच्यामध्ये वीरता प्रकटावी, यासाठी विजयादशमीचा उत्सव आहे. येथील क्षेत्री साजरा होणाऱ्या दसऱ्याचे महत्त्व आगळे वेगळे आहे. दत्तगुरूंची स्वारी पालखी मिरवणुकीने सीमोल्लंघन स्थळी नेण्यात येते. भव्य शामीयाना, केळीचे खुंट, विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा, पायघड्या यांनी परिसर सजवला जातो. तेथे आपट्याच्या पानांची पूजा होते. तोफेची सलामी होते व सोने लुटले जाते. तेथे ‘श्रीं’ना सुवासिनींकडून पंचारतीने ओवाळले जाते व भावपूर्णतेने ‘श्रीं’ चरणी सोने अर्पण केले जाते व पुन्हा पालखी मंदिराकडे येण्यासाठी प्रस्थान करते.

यावेळी विशिष्ट चालीत दत्तपदे, आरत्या, धावा, पाळणा इंदूकोटी म्हटली जाते. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमेचे उल्लंघन करून पुढे जाणे. सीमेचे उल्लंघन म्हणजे मर्यादेचे उल्लंघन नाही. माणूस परंपरेच्या, धार्मिकतेच्या, रूढीवादाच्या जोखाडात अडकलेला असतो. त्यातून साचेबद्धपणा येतो. म्हणूच आपल्या संकुचितपणाची सीमा ओलांडणे गरजेचे असते. संकुचित विचार सोडून उदामत्तेची कास धरणे, हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. दसरा सण हा स्त्री शक्‍तीचा जागर आहे. शक्‍तीशाली उत्सव म्हणजे दसरा. या उत्सवाची देवता व सामर्थ्य ही स्त्रीच आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Nrusinhwadi Dasara