हजारोंच्या उपस्थितीत आज त्र्यंबोली यात्रा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ‘भर पुनवेची चांदणी रात गं... अंबा दिसे मला राऊळात...’ देवीचे दर्शन आणि तेल वाहण्यासाठी आलेल्या आया-बायांनी धरलेल्या अशा भक्तिमय सुरांनी त्र्यंबोली टेकडी परिसर संमोहित झाला आहे. आज (ता. २५) ललिता पंचमीनिमित्त होणाऱ्या यात्रेसाठी परिसर सज्ज  झाला असून, विविध करमणुकीची साधने, खेळणी-खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी परिसर गजबजून गेला आहे.

कोल्हापूर - ‘भर पुनवेची चांदणी रात गं... अंबा दिसे मला राऊळात...’ देवीचे दर्शन आणि तेल वाहण्यासाठी आलेल्या आया-बायांनी धरलेल्या अशा भक्तिमय सुरांनी त्र्यंबोली टेकडी परिसर संमोहित झाला आहे. आज (ता. २५) ललिता पंचमीनिमित्त होणाऱ्या यात्रेसाठी परिसर सज्ज  झाला असून, विविध करमणुकीची साधने, खेळणी-खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी परिसर गजबजून गेला आहे. दरम्यान, दुपारनंतर आलेल्या 
जोरदार पावसाने सर्वांची तारांबळ उडाली.

सकाळी साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर त्र्यंबोली यात्रेच्या सोहळ्यासाठी अंबाबाईची मुख्य पालखी पारंपरिक मार्गाने बाहेर पडेल. त्यानंतर लवाजम्यासह पारंपरिक पद्धतीने फुलांनी सजविलेली तुळजाभवानीची पालखी भवानी मंडपातून यात्रेसाठी बाहेर पडेल. गुरुमहाराज वाडा येथील गुरुमहाराजांची पालखीही रवाना होईल. त्र्यंबोली टेकडी येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास कोहळा पूजन होईल. पारंपरिक पद्धतीने कोहळा फोडण्याचा विधी होईल. तुळजाभवानीची पालखी येताना टाकाळ्याजवळील कृष्ण मंदिरात थांबेल. अंबाबाईची पालखी जाताना शाहू मिल येथे थांबेल. 

‘केएमटी’ची विशेष बस सेवा
‘केएमटी’तर्फे आज(ता. २५) बिंदू चौकातून सकाळी पाचपासून यात्रा संपेपर्यंत विशेष बससेवा दिली जाणार आहे. प्रौढांना आठ, तर लहान मुलांना चार रुपये असा तिकीट दर असेल. यात्रेदिवशी कागल व मुडशिंगी मार्गावर धावणाऱ्या बसेसच्या मार्गामध्ये बदल केला आहे. बोंद्रेनगर ते कागल जाणाऱ्या सर्व बसेस एसटी स्टॅंड, कावळा नाका, मार्केट यार्ड, तावडे हॉटेलमार्गे राष्ट्रीय महामार्गावर ये जा करतील. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, राजोपाध्येनगर ते मुडशिंगी या मार्गावर धावणाऱ्या बसेस जाताना नियमित मार्गाने जातील, तर येताना मुडशिंगी, सरनोबतवाडी, शिवाजी विद्यापीठ, राजारामपुरी, जनता बझार, रेल्वे फाटकापासून पुढे नियमित मार्गाने धावतील.

वाहतूक मार्गात बदल
टेंबलाई उड्डाणपुलाजवळील टेलिफोन टॉवरकडून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. पर्यायी मार्ग असे -
- ताराराणी चौकातून रेल्वे फाटकमार्गे जाणारी अवजड वाहने ताराराणी चौकातून शिरोली जकात नाका, तावडे हॉटेलमार्गे पुढे जातील. 
 - टाकाळा चौकातून मंदिराकडे जाणारी अवजड वाहने टाकाळ्यावरील वि. स. खांडेकर मार्गावरून सायबर कॉलेज, शिवाजी विद्यापीठमार्गे जातील.
 - यात्रेसाठीच्या विशेष केएमटी बसेस टाकाळा सिग्नल, टेंबलाई रेल्वे फाटक, टेलिफोन टॉवरपासून शिवाजी विद्यापीठमार्गे पुन्हा शहरात येतील.

भारतीय क्रीडा क्षेत्रातील नवदुर्गा!

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने येथील शाहू यूथ फाऊंडेशनच्या वतीने ‘भारतीय क्रीडा क्षेत्रातील नवदुर्गा’ हा अनोखा उपक्रम राबवला आहे. सोशल मीडियावरून सर्वत्र क्रीडा क्षेत्रातील यशोलौकिकाच्या शिलेदार ठरलेल्या खेळाडूंची माहिती जाणीवपूर्वक तरुणाईपर्यंत पोचवली जात आहे. 

शतकभरापूर्वी चूल आणि मूल यात गुंतून पडलेली भारतीय नारी आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत आहे. अगदी २०१६ मध्ये पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे पुरुष खेळाडू एकामागोमाग एक अपयश चाखत असताना भारतीय क्रीडाजगताची लाज भारताच्या महिला खेळाडूंनीच वाचवली, हा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. 

पहिल्या माळेला या दिवशी भारताची नामवंत धावपटू पी. टी. उषा यांची माहिती शेअर केली. दुसऱ्या दिवशी महिला वेटलिफ्टर करणम मल्लेश्‍वरी यांची, तर तिसऱ्या दिवशी बॉक्‍सर एम. सी. मेरी कोम आणि आज बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांची माहिती ग्रुपवरून शेअर केली. येत्या सहा दिवसांत आणखी सहा खेळाडूंची माहिती शेअर केली 
जाणार आहे. या खेळाडूंनी कोणत्या अडचणींवर मात करून यश मिळवले, याबाबतची सविस्तर माहिती जाणीवपूर्वक नव्या पिढीसमोर आणली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Tryamboli festival