नवरात्रोत्सवात यिन सदस्य बनले पोलिसांचे मित्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात होणारी गर्दी, वाहतूक कोंडीने गुदमरणारा श्‍वास व पोलिसांची होणारी धावपळ लक्षात घेता डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे (यिन) सदस्य पोलिसांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ‘पोलिस मित्र’ म्हणून ते ठिकठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणार आहेत.

सुमारे दीडशे सदस्यांची ही तुकडी सामाजिक बांधिलकीची नवऊर्जा कशी असते, याचा दाखला देणार आहेत. यिन व शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिर परिसरात या उपक्रमास सुरवात झाली. 

नवरात्रोत्सवात कोल्हापूर शहरात लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, महाद्वार रोड नऊ दिवस गर्दीने गजबजून जातो. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धावपळ करावी लागते. आपणच पोलिसांना मदत केली तर असा विचार यिनच्या सदस्यांनी केला आणि त्यानुसार आजपासून पोलिस मित्र उपक्रमास सुरवात झाली. शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर व सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाचे उद्‌घाटन झाले.

या वेळी श्री. अमृतकर यांनी यिनच्या सदस्यांनी ‘पोलिस मित्र’ म्हणून उचललेल्या जबाबदारीचे कौतुक केले. या प्रसंगी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर उपस्थित होते. जयश्री देसाई हिने सूत्रसंचालन केले.  

उपक्रमात शहाजी छत्रपती महाविद्यालय, महावीर महाविद्यालय, न्यू कॉलेज, सायबर व गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयातील यिन सदस्य सहभागी झाले आहेत. उपक्रमाच्या उद्‌घाटनानंतर छत्रपती शिवाजी चौक, गुजरी कॉर्नर, भवानी मंडप, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, फॅशन कॉर्नर, शाहू मैदान, बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, महाद्वार रोडवर यिन सदस्य पोलिस मित्र म्हणून कार्यरत झाले. शहरात येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची ठिकाणे, अंबाबाई मंदिर व तुळजाभवानी मंदिराकडे जाणारे मार्ग यांची माहिती देत राहिले. यिन समन्वयक सूरज चव्हाण उपक्रमाचे संयोजन करत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news YIN members helping police in navratri festival