श्रद्धेय, औत्सुक्‍यपूर्ण विट्यातील पालख्यांची शर्यत

 प्रताप मेटकरी
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

विजयादशमी (दसरा) म्हणजे आनंदोत्सव. त्यानिमित्त विटा येथे दीडशे वर्षांपासून पालखी शर्यतीचा सोहळा होतो. हा सोहळा राज्यासह लाखो भाविकांच्या उपस्थितीत होतो. त्यानिमित्त...

विजयादशमी (दसरा) म्हणजे आनंदोत्सव. त्यानिमित्त विटा येथे दीडशे वर्षांपासून पालखी शर्यतीचा सोहळा होतो. हा सोहळा राज्यासह लाखो भाविकांच्या उपस्थितीत होतो. त्यानिमित्त...

विजयादशमीनिमित्त होणारा पालखी शर्यत सोहळा मूळ स्थान व विट्यातील श्री रेवणसिद्ध देवाच्या पालख्यांत होत असतो. शर्यतीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पालख्या एकाच देवाच्या म्हणजेच श्री रेवणसिद्धाच्या असतात. पालखी पळवणारे शर्यत जिंकतात किंवा हरतात; मात्र देव कधी हरत नसतो. मूळ स्थान व विटा येथील दोन्ही पालख्यांची सायंकाळी पाचच्या सुमारास मारुती व विठ्ठल मंदिरासमोर आरती केली जाते. काळेश्‍वर मंदिरासमोर दोन्ही पालख्या येतात. पाहुणी असल्याने मूळ स्थानच्या पालखीला पाच पावले पुढे थांबण्याचा मान असतो.

दोन्ही पालख्यांची काळेश्‍वर मंदिरासमोर आरती झाल्यानंतर शर्यत सोहळ्यास सुरुवात होते. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. आरती झाल्यानंतर विट्याची पालखी पळवण्यासाठी डाव्या बाजूला विटेकर तर मूळ स्थानची पालखी पळवण्यासाठी उजव्या बाजूला सुळेवाडीकर (रेवानगरकर) सज्ज असतात. या पालखी शर्यत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रासह देशातून लाखो भाविक उपस्थित राहतात. विट्याची पालखी पळवण्याचा मान शितोळे, गायकवाड, कदम, पाटील व सपकाळ घराण्यांकडे आहे. घराण्यांबरोबर शहरातील युवक, आबालवृद्ध पालखी पळवण्यासाठी पुढे असतात. जी पालखी सर्वप्रथम शिलंगण मैदानात पोचते ती विजयी होते. पूर्वीपासून चालत आलेली ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळ्याची परंपरा शहरवासीयांनी अखंडपणे जोपासली आहे. दीडशेहून अधिक वर्षांपासून मोठा भक्तिभाव व जातीय सलोखा राखून पालखी शर्यत सोहळा उत्साहात पार पडतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news Dasara tradition in Vita