कलिंगडची जेली, बीटचा पाव अन्‌ मक्‍याचे कटलेट...

नंदिनी नरेवाडी
Tuesday, 12 May 2020

डिजिटल स्पर्धेत भन्नाट पाककृतींची रेलचेल, लॉकडाऊन काळात उपलब्ध साहित्यापासून डिशेस

कोल्हापूर - कलिंगडच्या पांढऱ्या भागापासून जेली व थंडगार सरबत, बीटापासून पाव अन्‌ मक्‍याच्या पीठापासून रूचकर कटलेट हे पदार्थ कोणत्याही मोठ्या पाककला स्पर्धेतील नाहीत. तर लॉकडाऊनमुळे घरोघरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तयार केलेल्या डिशेस आहेत. घरी असलेल्या मुलांना रोज नवे कोणते पदार्थ खाऊ घालायचे, या प्रश्‍नाला उत्तर शोधताना महिलांच्या भन्नाट कल्पनेतून या नव्या डिशेस आकाराला येऊ लागल्या आहेत. डिजिटल पाककृती स्पर्धेत अशा प्रकारच्या पदार्थांची रेलचेल पहायला मिळते आहे.

इन्स्टाग्रामवर लॉकडाऊन रेसिपीज्‌ कॉन्टेस्ट

लॉकडाऊन मुळे मिळालेल्या वेळेचा अनेकांनी आपल्या छंदासाठी वापर केला. त्यामध्ये गायन, चित्रकला यांपासून ते स्वयंपाकघरात विविध पदार्थ ट्राय केले. यातच सोशल मिडीयावर डिजिटल स्पर्धाही घेतल्या जाऊ लागल्या. कोल्हापूरातील व्हेगॉंथेटिक या ग्रुपच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर लॉकडाऊन रेसिपीज्‌ कॉन्टेस्ट घेण्यात आली. यामध्ये तीसहून अधिक महिलांनी सहभागी होत विविध रेसिपीज्‌ बनवल्या. भारतातील विविध प्रांतातील डिशेसपासून कॉंन्टिनेंटल डिशेसचा समावेश होता. कोल्हापुरसह सांगली, सातारा, पुणे येथील महिला यामध्ये सहभागी झाल्या.

डिजिटल स्पर्धेमुळे प्रोत्साहन

स्वयंपाकात नवनवे प्रयोग करत राहणे, हा महिलांचा छंदच. लॉकडाऊनमुळे त्याला आणखी वाव मिळाला. अशा प्रकारच्या डिजिटल स्पर्धेमुळे त्यांना प्रोत्साहनही मिळाले. एखादी नवी केलेली रेसिपीचा फोटो पोस्ट करत त्याची कृतीही शेअर केली जाऊ लागली. एकीने बनविलेल्या रेसिपीमुळे अनेकांना त्यातून नव्या कल्पना सुचल्या आणि अनेक भन्नाट पाककृती नव्याने केल्या जाऊ लागल्या. यामध्ये फक्त महाराष्ट्रीयन व भारतीय पदार्थ नव्हे, तर परदेशातील काही पाककृती बनविण्याचा चान्स यानिमित्ताने त्यांना मिळाला.

लॉकडाऊन काळात आगळ्या वेगळ्या डिशेस करायला महिलांना उसंत मिळाली. याचाच फायदा घेत त्यांच्यासाठी पाककला स्पर्धा घेण्याचा विचार आला. ही स्पर्धा इन्स्टाग्रामवर घेतली असून कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातील महिला यामध्ये सहभागी झाल्या. तीसहून जास्त नव्या रेसिपी त्यानिमित्ताने पुढे आल्या
- स्मिता पाटील, व्हेगॉंथेटिक ग्रुप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Recipes Contest kolhapur on Instagram