कोरोना आला पण 'ती' सध्या काय करते ?

संभाजी गंडमाळे 
Monday, 30 March 2020

सेलीब्रिटी स्टे @  

रोजच हे चेहरे आपल्याला टीव्हीच्या स्क्रीनवर दिसतात. रंगमंचावर एकाहून एक झपाटून प्रयोगातून भेटतात. पण, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शुटींगच नव्हे तर नाटकांचे प्रयोगही रद्द झाले आहेत आणि त्या आता घरीच विविध छंद जोपासत आहेत. कुणी वाचनाचा सपाटा लावला आहे कुणी मस्तपैकी निवांतपणा अनुभवत आहेत तर कुणी स्केचिस आणि पेंटींगमध्येही रमल्या आहेत. अल्पावधीतच या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या 'त्या' सध्या काय करतात, याचा घेतलेला हा धांडोळा... 

सेलीब्रिटी नायिका करताहेत वाचन अन्‌ बरेच काही... 

'वैजू' चा वेळ घरच्यांसाठी... 

सध्या धम्माल मनोरंजनाची मालिका म्हणून प्रसिध्द होवू लागलेल्या "वैजू नंबर वन' या मालिकेची नायिका सोनाली पाटील. येथील राजाराम कॉलेजला प्राध्यापक म्हणूनही तिने काही काळ काम केले. अभिनयाची आवड पहिल्यापासूनच. त्यामुळे सोशल मीडिया, "टिकटॉक'च्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ ती अपलोड करायची. "जुळता जुळता जुळतयं की' नंतर आता ती "वैजू'च्या भूमिकेतून घराघरांत पोचली आहे. ती सांगते, ""मीरा रोडला "वैजू'चं शुटींग सुरू असतानाचा शुटींग बंदचा आदेश आला आणि आम्ही कोल्हापूरला परतलो. मिळालेला सारा वेळ मी घरच्यांसोबत माझ्या गावी एन्जॉय करते आहे. 

'सिध्दी'चा फिटनेसवर भर... 

'जीव झाला येडापीसा' या मालिकेतील मध्यवर्ती 'सिध्दी'ची भूमिका साकारते ती विदुला चौगुले. ती सांगते, "एरवी पंधरा ते सोळा तास शुटींगमध्येच जातात. सारं शेड्यूल टाईट असते. मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीत मात्र स्वतःसाठी एक वेगळं शेड्यूल तयार केलं आहे. या काळात मी स्वतःशीच संवाद साधते आहे. माझ्याकडून ज्या चुका होतात असे वाटते, त्या सुधारण्यावर भर देते आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मी जास्तच स्लिम असल्यानं आता फिटनेसवर अधिक भर दिला आहे. एक्‍सरसाईजबरोबरच वाचन आणि फिल्म पाहणे हे तर माझ्या आवडीचेच. त्यामुळे भरपूर पुस्तकं वाचणं आणि फिल्म्स पहाणं, हे सुध्दा या सुट्टीच्या काळात आवर्जुन करणार आहे.'' 

'कृष्णा'च्या फिल्मवर फिल्म... 

"हिमालयाची सावली' हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर चांगलेच गाजते आहे. या नाटकात कृष्णाची भूमिका साकारते आहे ती कृष्णा राजशेखर. मुंबईत या नाटकाचे अल्पावधीतच पंच्याहत्तरहून अधिक प्रयोग झाले. चौदा आणि पंधरा मार्चलाही प्रयोग होते. पण, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे प्रयोग रद्द झाल्याने तिने थेट कोल्हापूर गाठले. ती सांगते, "आमचं अख्खं घरचं मुळात फिल्मी. त्यामुळं मिळालेल्या वेळेत आता फिल्मवर फिल्म असा सपाटा लावला आहे. अवांतर वाचनावरही भर दिला आहे. विविध मालिकांसाठी ऑडिशनची तयारी सुरू आहे आणि 'टिकटॉक','इन्स्टाग्राम' तर आहेच आहे. 

'सोनी' रमलीय पेंटीगमध्ये... 

'जीव झाला येडापीसा' मधीलच शिवादाची लाडकी बहिण सोनी म्हणजेच कलापूरची शर्वरी जोग. रंगमंचावर विविध प्रयोग करतानाच तिने कलानिकेतन महाविद्यालयातून कला शिक्षणही पूर्ण केले. मात्र, अभिनयाच्या जोरावर या मालिकेतून तिची दमदार एंट्री झाली. ती सांगते, "आमचं शुटींग जैनापूरला. महापुराच्या काळात शुटींग झाले नाही आणि त्यामुळे शुटची बॅंक उपलब्ध नाही. मात्र, आता कोरोनामुळे सक्तीची सुट्टी मिळाली असून घरी जाता वेळ जात नाही. मात्र, तरीही मिळालेल्या वेळेचा सदुपयोग म्हणून वाचनाचा सपाटा लावला आहे. कमर्शियल आर्टिस्ट असल्याने स्केचिस आणि पेंटींगही चालू आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shooting has been canceled because of Corona effect and actress are now pursuing different hobbies at home