फडातला संसार फडातच झाला खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire in huts in sugar cane worker

हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याजवळच्या (गोडसाखर) माळावर असलेल्या ऊस तोड कामगारांच्या सात झोपड्यांना आग लागली. यामध्ये तीस हजाराच्या रोकडसह मजूर कुटूंबाचे संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी घडली नाही.

फडातला संसार फडातच झाला खाक

महागाव (कोल्हापूर)  : हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याजवळच्या (गोडसाखर) माळावर असलेल्या ऊस तोड कामगारांच्या सात झोपड्यांना आग लागली. यामध्ये तीस हजाराच्या रोकडसह मजूर कुटूंबाचे संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी घडली नाही.

याबाबतची माहिती अशी, गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी ऊस तोड करण्यास बीड, परभणी येथून ऊसतोड मजुरांची कुटूंबे दाखल झाली आहेत. कारखान्याजवळच्या शिवाजी बॅंक शाखेच्या मागे माळरानावर पन्नासहून अधिक कुटूंबे पालीच्या झोपड्या मारून वास्तव्याला आहेत. कुटुंबातील पुरुष व महिला मंडळी ऊसतोडीसाठी बाहेर गेली होती. झोपडीच्या परिसरात लहान मुले खेळत होती. आज दुपारी एका झोपडीला अचानक आग लागल्याचे जवळच्याच हॉटेलचालकाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ कारखाना प्रशासनाला याची माहिती दिली. वारा असल्याने आगीने रौद्र रूप घेतले. सलग असलेल्या झोपड्यांनाही आगीने कवेत घेतले. आग विझवण्याचा प्रयत्नही वाऱ्यामुळे अयशस्वी ठरत होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखाना प्रशासनाच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू झाला. नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणाही दाखल झाली. आगीचा विस्तार वाढण्यापूर्वी आग विझवण्यात यश आले तरी तोपर्यंत सात झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये सुग्रीव बिकड, महादेव बिकड, विष्णू बिकड (बीड), बाळू तोंडे, विक्रम तोंडे, बंशी तोंडे, बाळासाहेब चौरे (परभणी) यांच्या झोपड्यांचा समावेश होता. त्यांच्या झोपडीतील धान्य, भांडी, कपडे, रोकड आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये एक जनावरही भाजून जखमी झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे ही ऊसतोड मजुरांची कुटुंबांसमोर संकटांचा डोंगर उभा राहिला आहे. 

कुटुंबांना भरपाईसाठी प्रयत्न 
गावकामगार तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला. ब्रिस्क कंपनीचे जनरल मॅनेजर एच. व्ही. गुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन विमा कंपनीकडे तत्काळ नुकसान भरपाईसाठी क्‍लेम करण्याची ग्वाही दिली. तसेच या कुटुंबांना उदरनिर्वाहाची सोय करून देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. 
 

टॅग्स :Kolhapur