.. अन्यथा या ठिकाणी लागणार मटण मार्केटला टाळे! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

नागरी वस्तीत सुरु असणारा कत्तलखाना, मटण, चिकन व मच्छी मार्केट अन्यत्र हलवावे. मार्केटमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हे मार्केट अन्यत्र स्थलांतरीत करावे, गाळ्यांचा लिलाव पालिकेने करु नये या मागणीचे निवेदन नागरीकांनी पालिकेला दिले आहे. सातत्याने मागणी करुनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. आठवड्याभरात याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा, मटण मार्केटला टाळे ठोकण्याचा इशारा 133 नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

जयसिंगपूर : नागरी वस्तीत सुरु असणारा कत्तलखाना, मटण, चिकन व मच्छी मार्केट अन्यत्र हलवावे. मार्केटमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हे मार्केट अन्यत्र स्थलांतरीत करावे, गाळ्यांचा लिलाव पालिकेने करु नये या मागणीचे निवेदन नागरीकांनी पालिकेला दिले आहे. सातत्याने मागणी करुनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. आठवड्याभरात याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा, मटण मार्केटला टाळे ठोकण्याचा इशारा 133 नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

हे पण वाचा -  त्यामुळे झाला सांगली महापालिकेत गोंधळ

शहरातील गल्ली नं. अकरा ते तेरा, काडगे मळा, हॉस्पिटल परिसरात कत्तलखाना, मटण, चिकन, मच्छी मार्केट सुरु आहे. कोंबडी आणि शेळी पालनाचे शेडही उभारण्यात आले आहेत. नागरी वस्तीबरोबरच परिसरातील पाच रुग्णालयालगत हे मार्केट आहे. याच परिसरात नगरपालिका शाळा क्रमांक दोन व उर्दू शाळा क्रमांक सहा आहे. डेबॉन्स कॉर्नरपासून असलेल्या अजिंक्‍यतारा, काडगे मळा, रामनगर येथील रहिवाशांची वर्दळ असते. परिणामी दिवसभरातील जैविक अवयव, रक्ताचे पाणी मार्केटलगत असलेल्या आणि हॉस्पिटलजवळून जाणाऱ्या नाल्यात तसेच उघड्यावर टाकले जाते. त्यामुळे दुर्गंधी पसरली असूनही आरोग्यही धोक्‍यात आले आहे. 

हे पण वाचा -  कोट्यावधीचा भूखंड गेला असता घशात पण.....

2016 मध्ये नगरपालिकेने स्थलांतराचा ठराव केला आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत जैविक अवयक थेट गटारीत टाकले जातात. ते खाण्यासाठी भटक्‍या कुत्र्यांचा परिसरात वावर आहे. बऱ्याचदा या कुत्र्यांकडून नागरीकांवर हल्ले केले जात आहेत. मार्केटमुळे डेंगी, मलेरिया, साथीचे रोग वारंवार पसरत आहेत. वारंवार लेखी आणि तोंडी मागणी करुनदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात याबाबत निर्णय घेण्यात यावा. अन्यथा मटण मार्केटला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंगाडे, जयकुमार दानोळे, संदिप दानोळे, संजय देसाई, अनिल कलकुटगी, अल्ताफ मुल्ला, इलाई बसरगी, राजू गाडीवडर, मंजुळा कलकुटगी, सुजाता कलकुटगी आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी, शिरोळ तहसिलदार, जयसिंगपूर पोलिस ठाणे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jaysingpur peoples demand for shifting the matan marketplace