आणि तो सासूरवाडीला पोहोचलाच नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

शिरोली दुमाला-बीडशेड रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अमोल बाळासाहेब घारे (वय 42, रा. कळंबा बापूरामनगर) जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आनंद पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.

कसबा बीड (कोल्हापूर) ः शिरोली दुमाला-बीडशेड रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अमोल बाळासाहेब घारे (वय 42, रा. कळंबा बापूरामनगर) जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आनंद पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.

माहिती अशी, दुपारी सव्वा चारच्या सुमारास अमोल घारे सासुरवाडी शिरोली दुमाला पैकी नरगेवाडी येथे चालले होते, तर अंकुश पाटील (पाटेकरवाडी) व संग्राम पाटील (मांडरे) दोघे शिरोली दुमालाकडून पेट्रोल भरण्यासाठी पंपावर चालले होते. त्याच वेळी दोन्ही गाड्यांची जोरात समोरासमोर धडक झाली. यात अमोल यांचे डोके जोरात रस्त्यावर आपटल्याने अतिरक्तस्रावामुळे ते जागीच ठार झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई-वडील व मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या सासुरवाडीचे लोक घटनास्थळी आक्रोश करत होते. 

जखमींना 108 रुग्णवाहिकेतून तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. करवीरचे कॉन्स्टेबल संजय कोळी व संग्राम पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या वेळी कसबा बीडचे पोलिस पाटील व सावरवाडीचे पोलिस पाटील गजानन खोत उपस्थित होते.

गतिरोधकाची मागणी 
आनंद पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी सतत वर्दळ असते. रस्त्यावर नेहमी वाहनांची गर्दी असते. येथे नेहमीच छोटे मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे येथे गतिरोधक व्हावा अशी ग्रामस्थांतून मागणी होत होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalamba youth death in accident in shiroli Dumala