esakal | रक्तदाब आणि मधुमेहाशी दोन हात करत 102 वर्षाच्या वृद्धेने घरी राहूनच हरविले कोरोनाला
sakal

बोलून बातमी शोधा

102 years  Elderly woman corona free Kolhapur Marathi News

कोरोना संसर्गाच्या भितीने अनेकजण आपले प्राण गमवत असताना या 102 वर्षाच्या आजीने घरी राहूनही कोरोनावर मात करता येते, हा दिलेला मंत्र आदर्शवत असाच आहे.

रक्तदाब आणि मधुमेहाशी दोन हात करत 102 वर्षाच्या वृद्धेने घरी राहूनच हरविले कोरोनाला

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील 102 वर्षाच्या वृद्धेने घरातच उपचार घेवून कोरोनावर मात केली आहे. रक्तदाब आणि मधुमेह या इतर व्याधी असूनही प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्तीने तिने कोरोनाला बारा दिवसातच पळवून लावले. मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने केलेल्या उपचाराला आणि वृद्धेच्या दोन नातींनी दिलेल्या पाठबळाला अखेर आज यश आले. 

कोरोना संसर्गाच्या भितीने अनेकजण आपले प्राण गमवत असताना या 102 वर्षाच्या आजीने घरी राहूनही कोरोनावर मात करता येते, हा दिलेला मंत्र आदर्शवत असाच आहे. संबंधित वृद्धेचा मुलगा दौलत कारखान्याच्या सेवेत आहे. त्यांना 17 जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यानंतर पत्नी व वृद्ध आईचा अहवालही पॉझीटीव्ह आला. पती-पत्नीवर कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. 102 वर्षाच्या आजींनाही कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी प्रशासन आग्रही होते.

आई-वडील कोविड सेंटरमध्ये असल्याने त्यांच्या दोन मुलींवरच घरची जबाबदारी आली होती. त्यातच आजीची देखभालीची जबाबदारी त्यांच्यावरच होती. यामुळे वृद्धेच्या एका दिव्यांग नातीने तिच्यावर घरीच उपचार करण्यात यावेत अशी मागणी केली. परंतु स्थानिक प्रशासन ऐकत नसल्याने त्या दिव्यांग नातीने थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या कुटूंबावर ओढवलेली बिकट परिस्थिती कथन केली. अखेर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शासनाच्या नवीन धोरणानुसार या वृद्धेवर घरीच उपचार करण्यास परवानगी दिली. 

दरम्यान प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी भेट देवून वृद्धेच्या प्रकृतीची विचारपूस केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांच्या मार्गदर्शनाने मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय खारोडे, डी. बी. तनुगडे, आरोग्य सेविका श्रीमती ए. वाय. नाईक, आशा स्वयंसेविका एस. जी. हुबळे, व्ही. बी. कांबळे यांच्या पथकाने तिच्यावर यशस्वीपणे उपचार केले.

रोज तीनवेळा तिची तपासणी करण्यात येत होती. रक्तदाब, मधुमेह असतानाही तिने कोरोनाला केलेला प्रतिकार निश्‍चितच प्रेरणादायी आहे. आतापर्यंत कोरोना बाधित वृद्धांवर हॉस्पीटलमध्ये नेऊन उपचार केले जातात. वृद्ध लोक हाय रिस्कमध्ये मोडत असल्याने त्यांची अधिक काळजी घेतली जाते. परंतु, घरात राहून 102 वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केल्याची ही पहिलीच घटना असावी. 


वृद्धेचा आत्मविश्‍वास... 
कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याचे समजूनही संबंधित वृद्धा डगमगली नव्हती. दिव्यांग नातीसह दोन्ही नातींच्या पाठबळामुळे ती घरीच राहून उपचार घेण्यास तयार झाली. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्‍वास आणि प्रतिकारशक्तीमुळे वृद्धेने घरीच राहून कोरोनावर केलेली मात म्हणजे भितीने अवसान गाळणाऱ्यांसमोर आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल.