अबकारी'ची मोठी कारवाई ; उसाच्या शेतातून 131 किलो गांजा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

सत्ती येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची खात्रीशीर माहिती अबकारी विभागाला समजली

अथणी : तालुक्यातील सत्ती येथे उसाच्या शेतातून 131 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत पाच लाख रुपये आहे. 
अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १७) ही धडक कारवाई करून एकास अटक केली. देवाप्पा इराप्पा रुद्रगौडर (वय 75) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे अथणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सत्ती येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची खात्रीशीर माहिती अबकारी विभागाला समजली. त्यामुळे खात्याचे सहसंचालक डॉ. वाय मंजुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावचे अबकारी आयुक्त के. अरुणकुमार, चिक्कोडीचे अधिकारी एल. एस. सलगर, डी. एस. मुडशी, अथणी अबकारी विभागाचे निरीक्षक महेश धुळापण्णावर, उपनिरीक्षक एस. बी. असकी, कर्मचारी मोहन कांबळे, एल. सी. दानाप्पगोळ, एस. आय. बंडगर, बी. एन. सवदी, डी. ए. मुल्ला व विजय उप्पार व कर्मचाऱ्यांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. त्यात देवाप्पा रुद्रगौडर याने स्वतःच्या लाभासह झटपट श्रीमंतीसाठी उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत पाच लाख रुपये किंमतीचा 131 किलो गांजा जप्त करून देवाप्पा याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर करून गोकाक येथील कारागृहात त्याला पाठविण्यात आले.
 

पाच लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केल्याने ही तालुक्यातील पहिलीच मोठी कारवाई व घटना ठरली आहे. त्यामुळे या बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्या मंडळींचे धाबे दणाणले आहेत.

हे पण वाचाशासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार
 

आंतरराज्य कनेक्शनची शक्यता

अथणी तालुका हा कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील बेकायदेशीर व्यवहार अनेकदा आढळून येतात. अलीकडे गांजाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात उघड होत आहेत. सत्ती येथील घटनेत आंतरराज्य कनेक्शनची असण्याची शक्यता आहे. बेळगाव, सांगली व बागलकोट जिल्ह्यात त्यादृष्टीने अबकारी खात्यातील अधिकारी तपास करीत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 131 kg of cannabis seized in athani belgaum