धक्कादायक; चौकशी पूर्ण होण्याआधीच कोल्हापूर बाजार समितीच्या 15 संचालकांचे राजीनामे

0
0
Updated on

कोल्हापूर  : शेती उत्पन्न बाजार समितीच्या 15 संचालकांनी सोमवारी जिल्हा निबंधकांकडे आपले राजीनामे दिले. बेकायदेशीर नोकर भरती, तसेच जागा हस्तांतरण व्यवहार प्रकरणी बाजार समितीची चौकशी सुरू झाली आहे. ती अंतिम टप्प्यात असताना संचालकांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली. आता बाजार समितीवर प्रशासक येऊ नये, यासाठीही गोपनीय हालचाली सुरू झाल्या आहेत. 

यांनी दिले राजीनामे 
राजीनामा दिलेल्यांची नावे अशी ः नंदकुमार वळंजू, विलास साठे, उदयसिंह पाटील, उत्तम धुमाळ, शेखर एडगे, अमित कांबळे, आशालता पाटील, सदानंद कोरगावकर, बाबा लाड, कृष्णात पाटील, सर्जेराव पाटील, परशुराम खुडे, बाबूराव खोत. अन्य दोघे नावे समजू शकली नाहीत.

सभापती, उपसभापतींचे राजीनामे आज शक्‍य? 
सभापती दशरथ माने, उपसभापती संगीता पाटील, शिवसेनेचे संचालक संजय जाधव, शशिकांत आडनाईक यांनी राजीनामे दिलेले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सभापती व उपसभापती मंगळवारी राजीनामा देण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

गतवर्षी 24 जागांसाठी बाजार समितीत भरती प्रक्रिया होणार होती. त्यासाठी चार हजारांवर अर्ज आले होते. ते अर्ज बाजूला ठेवून संचालक मंडळातील बहुतांशींनी जवळच्या नातेवाईकांचीच येथे भरती केल्याचा आरोप झाला आहे. बाजार समितीतील काही जागा आर्थिक तोट्यातच भाडेतत्त्वावर देण्यासाठी हालचाली झाल्या. बेकायदेशीरपणे गाळे बांधकामासाठी हालचाली सुरू झाल्या. या सर्वांबाबत बाजार समितीतील शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे संचालक ऍड. किरण पाटील, शेतकरी प्रतिनिधी भगवान काटे, तसेच शासन नियुक्त माजी संचालक नाथाजी पाटील यांनी जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली होती. या बेकायदेशीर व्यवहारांचा पोलखोल करणारे वृत्त "सकाळ'मधून ही प्रसिद्ध झाले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर बाजार समिती संचालक मंडळाने केलेल्या कारभाराची चौकशी अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून सुरू झाली. ती जवळपास पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल आज सादर होणार होता. 
या चौकशीत आपण दोषी आढळल्यास संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते, याचा धसका घेतलेल्या बहुतेक संचालकांनी काही नेत्यांची मनधरणी केली; पण फारसे काही यश मिळत नसल्याचे दिसताच आज सायंकाळी जवळपास पंधरा संचालकांनी जिल्हा निबंधकांकडे राजीनामे दिले. नियमानुसार हे सर्व राजीनामे सभापतींकडून मंजूर होऊन पुन्हा जिल्हा निबंधकांकडे येणार आहेत, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. 

मुदत पुढील आठवड्यात संपणार 
या विद्यमान संचालक मंडळाची मुदत पुढील आठवड्यात संपणार आहे. अशात चौकशीमध्ये दोषी असल्याचा ठपका बसल्यास मंडळ बरखास्त होऊ शकते. त्यामुळे काहींनी बाजार समितीवर अशासकीय मंडळ येणार आणि जिल्ह्यातील एका राष्ट्रवादीच्या नेत्याला त्याचे अध्यक्षपद मिळणार, अशी हूल उठवली. त्याबाबत आज दिवसभर बाजार समिती वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती. काहींनी तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडे याबाबत विचारणाही केली; मात्र कायद्याच्या पातळीवर असे अशासकीय प्रशासक मंडळ तातडीने नियुक्त करता येणे अशक्‍य असल्याचे मत काही आजी-माजी संचालकांकडून व्यक्त होत आहे. 

नियमबाह्य व्यवहारांना आळा घाला 
बाजार समितीमध्ये सध्या झालेले नियमबाह्य कामकाज व घोटाळे पाहता या संचालक मंडळानंतर शासनाचा प्रथम वर्ग श्रेणीतील अधिकारीच येथे प्रशासक म्हणून नियुक्त करावा व येथील नियमबाह्य व्यवहारांना आळा घालावा, अशी मागणीही अन्य दोन व्यापारी प्रतिनिधींनी जिल्हा निबंधकांकडे केली आहे. 

आम्हाला कारभाराची मान्यता द्यावी! 
विद्यमान संचालक मंडळातील शासन नियुक्त संचालक ऍड. किरण पाटील, नाथाजी पाटील, भगवान काटे यांची संचालक म्हणून नियुक्ती अद्याप शासनाने रद्द केलेली नाही. बाजार समितीतील विद्यमान अन्य संचालकांनी राजीनामे दिले असले तरी आम्ही शासन नियुक्त संचालक म्हणून यापुढे आम्हाला कारभार चालवण्याची मान्यता द्यावी, अशी मागणीही या तिघांनी जिल्हा निबंधकाकडे केल्याचे सांगितले. 

संपादन ः विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Election 2026 Latest Update
PM Kisan 2026 Kolhapur farmers e-KYC Aadhaar bank linking
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com