प्रलंबित मागण्यांसाठी "या' शहरात 16 संघटना आल्या एकत्र, प्रांत कार्यालयासमोर घुमला आवाज

अवधूत पाटील
Monday, 10 August 2020

क्रांती दिनाचे औचित्य साधत केंद्रीय व राज्यातील सर्व कामगार संघटनांनी आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.

गडहिंग्लज : क्रांती दिनाचे औचित्य साधत केंद्रीय व राज्यातील सर्व कामगार संघटनांनी आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. जनता दलाच्या समन्वयाने येथील 16 कामगार संघटनांनी एकत्र येत प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली. यानिमित्ताने "हमारी युनियन, हमारी ताकद'चा आवाज घुमला. 

कामगार संघटनांचे प्रतिनिधी सकाळी साडेअकराला प्रांत कार्यालयासमोर जमले. तेथून दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत फिरून पुन्हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. या वेळी ऍड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, ""चळवळीतूनच कामगारांचे अनेक प्रश्‍न सुटले आहेत. आजचे आंदोलनही कामगारांच्या प्रश्‍नांसाठीच आहे.'' 

नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, ""कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. काम करणाऱ्यांवर अन्याय होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही.'' 

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, संजय चाळक, रफीक पटेल, के. टी. सिताप, शिवाजी होडगे, सागर पाटील, महंमद सनदी, विजय राशिवडेकर, नंदकुमार वाईंगडे, अविनाश कुलकर्णी यांचीही भाषणे झाली. 

संपत सावंत, संजय देसाई, गणपती पाथरवट, राजेंद्र मांडेकर, आण्णासाहेब शिरगावे, सुभाष निकम, आनंद पाटील, भीमराव तराळ, आनंद कोठावळे, राजेंद्र गवळी, विनायक नाईक, अंजना शारबिद्रे, संतोष सारंग, प्रमोद देसाई, अरविंद पाटील, तानाजी सूर्यवंशी, दिलीप कांबळे उपस्थित होते. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक एस. एच. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता. 

या आहेत मागण्या... 
जुनी पेन्शन योजना लागू करावी, लॉकडाउनमुळे संकटातील कामगारांना अन्न मिळेल याची हमी द्या, पगार व कामगार कपातीवर बंदी आणावी, असंघटित कामगारांच्या खात्यावर दरमहा दहा हजार जमा करा, सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यावरील निर्बंध उठवा, कामगार कायद्यात बदल करू नका, लॉकडाउनच्या काळातील कामाचा मोबदला द्या, लॉकडाउन काळात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नुकसानभरपाई द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचे फायदे द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल दुरुस्तीचे पैसे द्या, वेळेत मानधन जमा करावे, 55 वर्षांवरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोनाची कामे देऊ नयेत, एसटीचे शासनात विलीनीकरण करावे. 
 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 Organizations Together For Pending Demands Kolhapur Marathi News