
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.
कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 192 लोकांकडून 28 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल गुरुवार (6) महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये विनामास्क 173 जणांकडून 17300, सोशल डिस्टन्स 8 जणांकडून 4000, सार्वजनीक ठिकाणी थुंकल्याबाबत 10 जणांकडून 2000 तसेच प्लॅस्टिकचा वापर केलेल्या 1 व्यक्तिकडून 5000 असे एकुण 192 जणांकडून 28 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
हेही वाचा - आंबा प्रेमींसाठी खुशखबर; राज्य चाखणार आता हापूसची चव -
केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरीकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहनही महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.