स्वाभिमानीची ऊस परिषद राज्यभरातील शेतकऱ्यांसह मैदानावरच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

कोरोना महामारीमुळे राज्यातील परिस्थितीचा विचार करता ऊस दराच्या उचलीबाबत चर्चा होणे अपेक्षीत होते. मात्र
 

 कोल्हापूर : मुख्यमंत्री, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना भेटून कारखान्यांची बैठक घेवून ऊसदराबाबत निर्णय घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. ऊस परिषदेच्या परवानगीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ देवून ही ते हजर नव्हते. त्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद मैदानावरच होणार असा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.जालंदर पाटील यांनी घेतला आहे.

ऊस परिषदेला परवानी देण्याबाबतचे निवेदन त्यांच्या शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले. यावेळी गलांडे यांनी परवानगीबाबत कळविले जाईल, असे सांगितले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना निर्णय जाहीर केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 19वी ऊस परिषद घेण्यापूर्वीच आम्ही मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांना भेटून कारखानदार आणि शेतकऱ्यांची बैठक घेवून दराची चर्चा करावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परिषद घेण्याचा निर्णय आम्ही पक्का केला. त्याची परवानगी मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे आलो. मात्र तीन वाजल्यापासूनते पाच वाजेपर्यंत ते आले नाहीत. प्रशासनाशी चर्चा करून ऊस परिषदेचे नियोजन आम्ही करणार होतो. मात्र त्यांनीही आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांना निवेदन देवून परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. मात्र त्यांनीही याबाबत तुम्हाला कळविले जाईल, असे सांगितले. 

एकंदरीतच आम्ही कोरोनाकाळातील नियम पाळून ऊस परिषद घेण्यास तयार असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसह जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावरच नेहमी प्रमाणे ऊस परिषद होईल. दोन नोव्हेंबरला होणाऱ्या या परिषदेचे नियोजन आम्ही आता आमच्या पद्धतीने करणार आहोत. कोणत्याही परीस्थितीत 19 वी ऊस परिषद ही मैदानावरच होईल, असे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. शिष्टमंडळात. जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, रमेश भोजकर, विठ्ठल मोरे, विक्रम पाटील, मिलिंद साखरेप, संजय चौगले, मारुती पाटील, युवराज पाटील, विनय पाटील, नितीन पवार आदींचा समावेश होता. 

हेही वाचा- शाहूवाडीचे योगीराज गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश -

कोरोना महामारीमुळे राज्यातील परिस्थितीचा विचार करता ऊस दराच्या उचलीबाबत चर्चा होणे अपेक्षीत होते. मात्र तसे होत नसल्यामुळे आता आम्ही राज्यातील शेतकरी, पदाधिकारी यांना बोलावणार आहोत. पाच-सहा फुटांचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत मैदानावरच ही ऊस परिषद होईल, असे ही प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी स्पष्ट केले. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19th Sugarcane Conference of Swabhimani Shetkari Sanghatana