जरळीत पाखरांनी घडविले 20 अपघात! 

अजित माद्याळे
Friday, 9 October 2020

आजपर्यंत अनेक प्रकारचे अपघात आपण पाहतो. त्यात आता पथदिव्याच्या प्रकाशातील पाखरांमुळे होणाऱ्या अपघातांचा समावेश करावा लागेल.

गडहिंग्लज : आजपर्यंत अनेक प्रकारचे अपघात आपण पाहतो. त्यात आता पथदिव्याच्या प्रकाशातील पाखरांमुळे होणाऱ्या अपघातांचा समावेश करावा लागेल. अशीच घटना जरळी (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यावर बुधवारी (ता. 7) रात्री घडली. मृत पाखरांचा खच पडून त्यावरून जाताना वीसहून अधिक मोटरसायकली घसरल्या. सुदैवाने यामध्ये कोणालाही जिवीत हानी आणि गंभीर दुखापत झाली नाही. 

दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्याच्या सुमारास पथदिव्याच्या प्रकाशाला लहान-लहान पाखरे गोळा होतात. या पाखरांचे आयुष्य फार नसते. केवळ पाऊण ते एक तासातच ते मृत होतात आणि जमिनीवर पडतात. त्यातून तेलसदृश्‍य द्रव तयार होतो आणि रस्त्यावर निसरट बनते. जरळी बंधाऱ्यावर हनुमान मंदिरावर पथदिवा आहे. या दिव्याभोवती रोज हजारो पाखरे येतात. बंधाऱ्यावरील रस्त्यावरच या पाखरांचा खच पडतो. बुधवारी रात्री हे प्रमाण अधिकच होते. मृत पाखरांचा खच पडला होता. तेलसदृश्‍य द्रव तयार झाल्याने मोठ्या प्रमाणात निसरट झाली होती. याचा अंदाज न आल्याने सुसाट येणारे वाहनधारक घसरत होते. मृत पाखरांतून जाताना मोटरसायकल घसरून अपघात होत होता. रात्री नऊपर्यंत सुमारे वीसहून अधिक मोटरसायकली येथे घसरल्या. 

ही घटना समजताच तत्काळ पोलिस पाटील विलास बागडी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, पाटबंधारेचे चौकीदार आप्पासाहेब चौगुले, अविनाश कुलकर्णी यांच्यासह इतर तरूण वाहनधारकांना सूचना देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बंधाऱ्यांवर थांबले होते. सूचना देवूनही काही वाहनधारक गतीने मोटरसायकल आणताना सर्वांसमोरच घसरून पडत होते. सुदैवाने बंधाऱ्याच्या पूर्वेला लोखंडी संरक्षक कठडा असल्याने गंभीर घटना घडून जिवीत हानी झाली नाही. काहींना किरकोळ दुखापतीवर निभावले. 

संपादन - सचिन चराटी 

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 Accidents Caused By Flying Birds ! Kolhapur Marathi News