
नामवंत कंपन्यांकडून बनावट पावत्याचा आधार;
बंगळूर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंटेलिजेंस डायरेक्टोरेट जनरलच्या बंगळूर शाखेने (बीझेडयू) नुकतीच सुमारे 200 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा शोध घेतला आहे. या घोटाळ्यामागील काही महत्त्वाच्या सूत्रधारांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही आठवड्यात देशभरात सुसूत्र शोध मोहिमांमध्ये डीजीजीआय, बीझेडयूने जीएसटी फसवणूक उघडकीस आणली. त्यामध्ये 1,000 कोटीच्या बनावट पावत्या तयार करण्यात गुंतलेल्या काही सुप्रसिद्ध कंपन्यांनी 200 कोटीच्या आसपास जीएसटी चुकविण्यात आल्याचे आढळून आले आहे.
एका मोठ्या कारवाईत बंगळूरस्थित टेक कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल केला. कोणतीही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता देशातील प्रस्थापित चिनी कंपन्यांना बनावट पावत्या देण्यास गुंतवले गेले होते, असे एका डीजीजीआय, बीझेडयूने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
काही चिनी संस्थांनी या कंपनीला हस्तांतरित केलेली 500 कोटी रुपयांची रक्कम भारतातील कंपन्या, व्यक्तींना आणि अन्य संशयास्पद कार्यांसाठी पैसे देण्याकरिता वापरण्यात आल्याची माहिती आहे. चिनी नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमांचे संयोजन केले. दुसऱ्या एका घटनेत, डीजीजीआय, बीझेडयूने दुसऱ्या खासगी मर्यादित कंपनीविरूद्ध राज्यातील काही सुप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांना (एमएनसी) माल न देता बोगस पावत्या पुरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला. प्राप्त झालेल्या एमएनसीमधून 15 कोटींची मोठी वसुली झाली. फसव्या कंपन्यांच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकृत डीजीजीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे: नितेश राणे
जीएसटी चोरट्यांपैकी बंगळूरचा एक भंगार व्यापारी असून त्याने 6.5 कोटी रुपयांचे बनावट प्राप्तिकर क्रेडिट (आयटीसी) घेतले आहे. डीजीजीआय, बीझेडयूने 2019-20 मध्ये 1,038 कोटी रुपये वसूल केले असले, तरी 3,400 कोटी रुपयांचा कर चुकविला. 2020-21 दरम्यान आतापर्यंत 478 कोटी रुपयांची रक्कम वसूल केल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
संपादन- अर्चना बनगे