कोरोना काळात 200 प्रसूती, बिकट स्थितीत खबरदारी घेत सेवा, गडहिंग्लज तालुक्‍यातील "हे' ग्रामीण रुग्णालय ठरतेय आधार

दिनकर पाटील
Wednesday, 5 August 2020

देशात कोरोना महामारीचे थैमान सुरू असून वैद्यकीय सेवेवर मोठा ताण आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील गरोदर मातांना कोरोनाचा फटका बसतो आहे.

नेसरी : देशात कोरोना महामारीचे थैमान सुरू असून वैद्यकीय सेवेवर मोठा ताण आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील गरोदर मातांना कोरोनाचा फटका बसतो आहे. अशा बिकट परिस्थितीतही योग्य ती खबरदारी घेऊन नेसरी ग्रामीण रुग्णालयात चार महिन्यांत दोनशेहून अधिक गरोदर मातांची प्रसूती झाली. कोरोना कालावधीतील या सेवेचे ग्रामीण भागातून कौतुक होत आहे. 

अधीक्षक हर्षल वसकले व सहकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून इतर रुग्णसेवा अखंडित ठेवली आहे. लॉकडाउनच्या काळात मुंबई, पुणे आदी बाहेर ठिकाणांहून हजारो लोक गावी परतले. इतर ठिकाणांच्या डॉक्‍टरांची वैद्यकीय तपासणी अर्धवट सोडून अनेक गरोदर माता गावी परतल्या. गावी आल्यानंतर काही मातांना प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे रुग्णालयात तपासणी फाईल्स न आणता दाखल झाल्या.

यामुळे पूर्वीची तपासणी हिस्ट्री नसतानाही डॉ. वसकले व सहकाऱ्यांनी धाडसाने यशस्वी प्रसूती केल्या. संबंधित महिलांना सरकारी रुग्णालयात सेवा मिळाल्याने नातेवाईकांची हजारो रुपयांची बचत झाली आहे. कोरोना काळात 46 सिझर, 176 गंभीर शस्त्रक्रिया, 127 कुटुब नियोजन व 200 किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या. 150 ते 200 रुग्णांची दैनंदिन तपासणी सुरू आहे. रुग्णालयामध्ये नेसरी, कोवाड, अडकूर परिसरातील गरोदर मातांची सोमवार, मंगळवारी तपासणीसाठी गर्दी असते.

याबरोबरच अपघात, सर्पदंश, कुत्रा चावणे यासारखे रुग्ण ग्रामीण रुग्णालयाच्या सेवेचा लाभ घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टर, कर्मचारी यांच्या रुग्ण सेवेबद्दल समाधान व्यक्‍त होत आहे. रुग्णालयात डॉ. वसकले, डॉ. वृषाली केळकर, डॉ. मिलिंद साळुंखे, डॉ. सत्यजित देसाई, डॉ. प्रशांत चौगुले, परिचारिका ऊर्जादेवी पाटील, रत्ना वळवी, माया वर्णे, हेमामालिनी झेंडे, रोहिणी रेणुशे, ज्योती आखाडे, परिचारक भूषण इंगवले, कर्मचारी प्रशांत पवार, राधा कांबळे, मंगल कांबळे, निखिल मारोडा, विजय अस्वले सेवा बजावत आहेत. 

कोरोना काळात मदतीची खरी गरज
कोरोना काळात मदतीची खरी गरज होती, ती गरोदर मातांना. अशा अवस्थेत महिलांना दूरचा प्रवास करणे धोक्‍याचे असते. उपचारासाठी शहराकडे जाणेही लॉकडाउनमुळे अडचणीचे होते. त्यांची परवड होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेत गरोदर मातांची प्रसूती केली. या सेवेत सहकारी डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे होते. 
- डॉ. हर्षल वसकले, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय 

हजारो रुपयांची बचत
नेसरी ग्रामीण रुग्णालयात कोरोना परिस्थितीच्या बिकट काळातही गरोदर महिलांची योग्य काळजी घेऊन प्रसूती केल्या जात आहेत. यामुळे हजारो रुपयांची बचत झाली आहे. तसेच चांगली आरोग्य सेवाही मिळाली. 
- कविता यादव, रुग्ण, कोवाड, चंदगड 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 Deliveries During The Corona Period Kolhapur Marathi News