सैरंध्री चित्रपटाने जागवली होती राष्ट्रचेतना...!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Sairandhri movie has aroused national consciousness ...!

सैरंध्री चित्रपटाने जागवली होती राष्ट्रचेतना...! 

कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार केला आणि "सैरंध्री'या चित्रपटाची निर्मिती केली. लोकमान्य टिळक यांनी पुण्यातील आर्यन सिनेमागृहात चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना "सिनेमा केसरी' ही पदवी दिली. या ऐतिहासिक घटनेला मंगळवारी (ता. 11) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात साऱ्यांच्या नसानसांत राष्ट्रचेतना जागवणाऱ्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतींना यानिमित्ताने पुन्हा उजाळा मिळणार आहे. 

पारतंत्र्याच्या काळात तत्कालीन राजकीय परिस्थितीवर उघड भाष्य करणे शक्‍य नव्हते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मराठी नाटक आणि चित्रपटकर्त्यांनी पौराणिक कथांचा आधार घेत रूपकांच्या माध्यमातून राष्ट्रचेतना जागवण्याचा प्रयत्न केला. 1913 साली इंग्रजांनी "कीचकवध' नाटकावर बंदी घातल्यानंतर बाबूराव पेंटर यांनी याच विषयावर आधारित "सैरंध्री' हा चित्रपट तयार केला. कीचकवधाचे दृश्‍य त्यांनी इतके परिणामकारक चित्रित केले, की ते पाहून प्रेक्षागृहातील महिला बेशुद्ध पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी मनुष्यवधाचा आक्षेप या प्रसंगावर घेतला. अखेर बाबूराव पेंटर यांनी चित्रपटातील व्यक्तिरेखाच त्यांच्यासमोर आणल्या. मात्र, तरीही यानिमित्ताने इंग्रजांनी सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आणि ते आजही कार्यरत आहे. 

कल्पक यंत्रविशारद... 
बाबूराव कृष्णराव सुतार ऊर्फ बाबूराव पेंटर म्हणजे रंगकुंचल्यातून सृष्टीतील सौंदर्य कागदावर साकारणारे चित्रकार, मातीला आकार देऊन दगडाला देवपण आणणारे शिल्पकार, आपल्या कल्पकतेतून यंत्रे बनविणारे यंत्रविशारद, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कथाकारही. वयाच्या सतराव्या वर्षीच त्यांच्या कल्पकतेतून पाण्यावर चालणारी सायकल निर्माण झाली. लहान प्रोजेक्‍टर मशीनपासून चलचित्र कॅमेऱ्याची निर्मिती, मूकपटांतील प्रसंग प्रभावी वाटावे, यासाठी पडद्यासमोर पियानो वाजविण्याची कल्पनाही त्यांचीच. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी भव्य पोस्टर्सची संकल्पनाही त्यांचीच. ही पोस्टर्स पाहूनच "सिंहगड'च्या वेळी करमणूक कराला प्रारंभ झाला. आऊटडोअर चित्रीकरणासाठी रिफ्लेक्‍टर वापरून प्रकाश योजना, पन्हाळगडावर झालेले भारतातील पहिले ऐतिहासिक बाह्यचित्रणही त्यांनीच केले. अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांतून त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली, असे ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी सांगतात. 

"किफ'मध्ये प्रसंग... 
भारतीय सिनेसृष्टीला नवनवीन प्रयोगांनी अधिक समृद्ध करणाऱ्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे नाव कोल्हापूर चित्रनगरीला देण्याची मागणी कैक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही. "सैरंध्री'च्या शताब्दीचाही तसा सर्वच घटकांना विसर पडला आहे. मात्र, 12 मार्चपासून आयनॉक्‍समध्ये रंगणाऱ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ) महोत्सवातील एका सत्रात "सैरंध्री' चित्रपटातील तो ऐतिहासिक प्रसंग नव्याने चित्रीत करून दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

Web Title: 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..