
शिक्षणाची सुविधा जवळपास नाही. पण, शिकण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच राज्याची सीमा ओलांडून "त्यांनी' गडहिंग्लज गाठले आहे.
गडहिंग्लज : शिक्षणाची सुविधा जवळपास नाही. पण, शिकण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच राज्याची सीमा ओलांडून "त्यांनी' गडहिंग्लज गाठले आहे. "बेटी बचाओ, बेटी पढाओ'ला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिंनीसाठी अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजना सुरू केली आहे. पण, राज्याची सीमा ओलांडून गडहिंग्लजला शिक्षणासाठी येणाऱ्या 310 सावित्रीच्या लेकींना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांना कर्नाटकातील रहिवास अडचणीचा ठरत आहे.
गडहिंग्लज शहर शिक्षणाचे केंद्र बनले आहे.
पारंपरिक विद्या शाखांसोबतच वैद्यकीय, इंजिनिअरिंग महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे उपविभागासह कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थी शिक्षणासाठी गडहिंग्लजला येतात. कर्नाटकातील महाराष्ट्र सीमेवरील दड्डी, मणगुत्ती, संकेश्वर, कोट, भैरापूर, बुगटे अल्लूर, अत्याळ, लिंगनूर, खवणेवाडी, हरगापूरगड, सलामवाडी, राशिंग, शिप्पूर यासह विविध गावातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेतून एसटीचा पास मोफत दिला जातो. मात्र, कर्नाटकातून गडहिंग्लजला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थिनी महाराष्ट्रातील रहिवासी असणे अनिवार्य आहे. हीच अट अडचणीची ठरत आहे.
परिणामी, कर्नाटकातील या विद्यार्थिनींना प्रवासासाठी पूर्ण रक्कम मोजावी लागत आहे. त्याचा पालकांवर आर्थिक ताण पडत आहे. संपूर्ण प्रवासासाठी नसेना, किमान महाराष्ट्रात राज्यातील प्रवासाच्या अंतरात सवलत द्यावी, अशी मागणी विद्यार्थिनींकडून होत आहे.
गडहिंग्लजला शिकणाऱ्या कर्नाटकातील मुली
- रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय..... 160
- गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालय.................. 58
- राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय................. 25
- संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय........... 18
- साधना कनिष्ठ महाविद्यालय....................... 11
- जागृती हायस्कूल.................................... 15
- गडहिंग्लज हायस्कूल................................ 20
- साधना हायस्कूल.................................... 03
पूर्ण तिकीट काढून प्रवास
शिक्षणाची सुविधा नसल्याने आम्ही गडहिंग्लजला शिकण्यासाठी येतो. पण, कर्नाटकातील रहिवासी असल्याने मोफत पासचा लाभ मिळत नाही. सध्यातरी बसचे पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्रातील प्रवासापुरता तरी सवलतीचा लाभ मिळावा.
- सोनाली साळुंखे, बुगटे अल्लूर, ता. हुक्केरी, रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय, गडहिंग्लज
मुली कर्नाटकातील रहिवासी
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना ही महाराष्ट्र शासनाची आहे. गडहिंग्लजला शिक्षणासाठी येणाऱ्या मुली कर्नाटकातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ देता येत नाही.
- एस. बी. चव्हाण, आगारप्रमुख, गडहिंग्लज एसटी आगार
संपादन - सचिन चराटी
kolhapur