मुमेवाडीत सहा महिन्यात 35 अपघात

अशोक तोरस्कर
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुमेवाडी (ता. आजरा) येथील चौकात रात्री 2 वाजता सावंतवाडीहून आलेली (एम.एच.7 एजी.2484) मोटार तीन फुटाचा दगडी कठडा तोडून भिऊंगडे यांच्या घराच्या आवारात घुसली. या वेळी वीजेचा खांब मोडून पडला. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. निरीक्षण आणि नोंदीनुसार येथे सहा महिन्यात असे छोटे-मोठे 35 अपघात झाले आहेत.

उत्तूर : मुमेवाडी (ता. आजरा) येथील चौकात रात्री 2 वाजता सावंतवाडीहून आलेली (एम.एच.7 एजी.2484) मोटार तीन फुटाचा दगडी कठडा तोडून भिऊंगडे यांच्या घराच्या आवारात घुसली. या वेळी वीजेचा खांब मोडून पडला. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. निरीक्षण आणि नोंदीनुसार येथे सहा महिन्यात असे छोटे-मोठे 35 अपघात झाले आहेत. यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांना रस्त्याकडेला घर... नकोरे बाबा म्हणऱ्याची वेळ आली आहे. 

या ठिकाणाची मुमेवाडी तिठ्ठा अशी ओळख आहे. येथून कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा व वांजोळेवाडीकडे जाणारे असे चार रस्ते आहेत. तिन्ही बाजूंनी भरधाव वेगाने वाहने या चौकात येतात. वाहने एकमेकांसमोर अचानक आल्याने वाहनचालक गोंधळून जातात. एकमेकांची धडकाधडक होते. थोडावेळ वादावादी होते. गाडी दुरुस्त करणाऱ्यांना बोलावून घेतले जाते. मोडतोडीची खर्च घेतला जातो आणि गाड्या आपआपल्या गावी मार्गस्थ होतात. हे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. यापैकी बऱ्याच चार चाकी गाड्या रस्त्याशेजारी रहात असलेल्या घरावर येवून आदळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे येथील जवळपास राहणारे ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. 

वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून याठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने छोटे स्पिड ब्रेकर बसवले आहेत. मात्र ते अतीवेगाच्या वाहनापुढे तकलादू ठरत आहेत. दिशादर्शक फलकाकडे वाहन चालक दुर्लक्ष करतात. यामुळेच या ठिकाणी अपघात होतात. विशेषतः रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचे अपघात झाल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. 

शेरकरी थोडक्‍यात बचावले 
या चौकापासून 500 मीटर अंतरावर मुमेवाडी घाट आहे. हा घाट नागमोडी वळणाचा आहे. या वळणावर मारुती भिऊंगडे यांचे शेत आहे. दोन वर्षापुर्वी भरधाव वाहने येवून त्यांच्या शेतात येवून पलटी व्हायची. एकवेळ तर ऊस लावण सुरू असताना वाहन शेतात काम करणाऱ्यांसमोर 10 फुटावर येवून कोसळले. या वेळी काही शेतकरी थोडक्‍यात बचावले. अशा घटनांनंतर त्यांच्या शेतात काम करायला मजूर मिळेनासे झाले. या ठिकाणी आता संरक्षण कठडा बांधल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. 

चालकाकडून भरपाई
अपघातानंतर महावितरणने वाहन चालकाकडून भरपाई घेतली. वीज वाहिन्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बोलावून या ठिकाणी खांब उभा करण्याचे काम सुरू आहे. याचा सर्व खर्च वाहनाचालकाला करायला लागणार आहे. शिवाय देखरेख फी महावितरणला द्यावी लागणार आहे. 
- सुनील गुरव, कनिष्ठ अभियंता, उत्तूर 

अपघात हे नित्याचेच
या ठिकाणी अपघात हे नित्याचे झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी सार्वजनीक बांधकाम खात्याने उपाययोजना करावी. 
- पांडूरंग भेंबरे, ग्रामस्थ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 Accidents In Six Months In Mumwadi Kolhapur Marathi News