दलित वस्ती निधीपासून 374 गावे वंचित

 374 villages deprived of Dalit Vasti Nidhi
374 villages deprived of Dalit Vasti Nidhi

कोल्हापूर : जिल्ह्यातील दलित वस्तींसाठी येत असलेला निधी अनेक गावांत पोहोचत नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील 1025 गावांपैकी 374 गावांना व 800 पेक्षा अधिक दलित वस्तींना मागील दोन वर्षांत रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे या वस्त्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. निधी वितरणात होत असलेला राजकीय हस्तक्षेप आणि दबावाखाली कार्यरत असलेली जिल्हा परिषदेची यंत्रणा यामुळेच या वस्त्या निधीपासून वंचित आहेत. निधी वितरणाबाबत देण्यात आलेल्या शासकीय आदेशाचे पालन गाव स्तरापासून जिल्हा परिषदेपर्यंत होत नसल्याचा परिणाम दलित वस्ती विकासावर झाल्याचे चित्र आहे. 
जिल्ह्यातील अनुसूचित जातीची लोकसंख्या 3 लाख 87 हजार 550 इतकी आहे. हे लोक 1025 गावे व त्यातील 2503 वसाहतीत राहत आहेत. या वसाहतींचा विकास करण्यासाठी दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून कोट्यवधींचा निधी देण्यात येतो. या वस्तींच्या विकासासाठी पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करून प्राधान्यक्रमाने त्यांचा विकास होणे आवश्‍यक आहे; मात्र दरवर्षी त्याच त्या वसाहतींना व गावांना निधी देऊन उर्वरित दलित वस्तींना विकासापासून वंचित ठेवले जात आहे. सध्याचा आराखडा 2018 ते 2023 या कालावधीसाठी आहे; मात्र सध्याचे तिसरे वर्ष असून 2503 पैकी सुमारे 800 पेक्षा अधिक दलित वस्तींना निधी मिळालेला नाही. शिक्षक बदली व अन्य कामासाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांना मात्र या अन्यायाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, हे विशेष. 
... 
निधी वितरण प्रक्रिया 
गावातील दलित वस्तींची मागणी. 
ग्रामपंचायतीचा ठराव. 
पंचायत समितीकडून छाननी. 
गटविकास अधिकाऱ्यांकडून प्राधान्यक्रमाची खात्री. 
समाजकल्याण समितीची शिफारस. 
अतिरिक्‍त सीईओंकडून मान्यता. 
..... 
निधीपासून वंचित गावांची संख्या 
तालुका*गावांची संख्या*निधीपासून वंचित गावे 
आजरा*73*68 
भुदरगड*97*27 
चंदगड*109*41 
गडहिंग्लज*89*34 
कागल*83*25 
करवीर*118*16 
पन्हाळा*111*43 
राधानगरी*98*41 
शाहूवाडी*106*58 
शिरोळ*52*10 
हातकणंगले*60*1 
गगनबावडा*29*10 
... 
निधी वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत 
जिल्ह्यातील दलित वस्तीसाठी 36 कोटींचा निधी आला आहे. त्याच्या वाटपावरून वाद आहे हे योग्य नाही. लोकप्रतिनिधींनी परस्पर निधीचे वाटप करण्याचा प्रयत्न करू नये. समाजकल्याण विभागाने याची कार्यपद्धती जाहीर करावी. प्राधान्यक्रमाने निधीचे वाटप न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल. 
- सुभाष देसाई, ब्लॅक पॅंथर. 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com