अबब.. 45 कोटी लिटर दुधाचे देशात रोज उत्पादन -

प्रतिनिधी
सोमवार, 1 जून 2020

आज जागतिक दूध दिन आहे, या पार्श्‍वभूमीवर या व्यवसायाची माहिती घेतली असताना महाराष्ट्रात गहू, भात पिकानंतर दूध उत्पादन हाच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याचे आढळून आले. राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित केल्या जाणाऱ्या एकूण दुधापैकी जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा वाटा मोठा आहे. 

कोल्हापूर ः देशात रोज 45 कोटी लिटर दूध उत्पादन होत असून, महाराष्ट्रातील एकूण दूध उत्पादनाच्या 60 टक्के दूध खासगी क्षेत्राकडे जात आहे. राज्यात रोज दोन कोटी 10 लाख लिटर दूध संकलित होत असून, यातील केवळ 30 ते 40 लाख लिटर दूधच सहकारी संघामार्फत संकलित केले जाते. 
आज जागतिक दूध दिन आहे, या पार्श्‍वभूमीवर या व्यवसायाची माहिती घेतली असताना महाराष्ट्रात गहू, भात पिकानंतर दूध उत्पादन हाच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याचे आढळून आले. राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित केल्या जाणाऱ्या एकूण दुधापैकी जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा वाटा मोठा आहे. 
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार एका व्यक्तीला रोज किमान 280 मिलिलिटर दुधाची गरज आहे. 2017 मध्ये ही गरज 330 मिलिलिटर होती. पंजाबमध्ये हेच प्रमाण प्रतिव्यक्ती 500 मिलिलिटर, तर बिहार, ओरिसामधील आर्थिक परिस्थिती पाहता हे प्रमाण 150 ते 180 मिलिलिटर आहे. देशात दैनंदिन दूध उत्पादनापैकी 20 ते 25 कोटी लिटर दूध हे म्हशीचे, तर उर्वरित दूध हे गायीचे आहे. 
महाराष्ट्रातील दूध उत्पादनापैकी 50 टक्के दूध हे पिशवीबंद विकले जाते. उर्वरित दुधापैकी 25 टक्के दूध हे औद्योगिक कारणासाठी वापरले जाते; तर उर्वरित दुधापासून लोणी, तूप यासारखे उपपदार्थ तयार केले जातात. देशभरातील दुभत्या जनावरांची घटती संख्या चिंतेचा विषय असून, त्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट होत आहे. या व्यवसायात कष्ट करावे लागत असल्याने त्याकडे नवी पिढी वळत नाही, त्याचाही परिणाम या व्यवसायावर झाला आहे. 

राज्यातील खासगी दूध संघ 
गेवराई, स्वराज्य, सोनाई व चितळे हे राज्यातील खासगी दूध संघ कार्यरत आहेत; तर गोकुळ, वारणा, राजारामबापू, शिवामृत, पुणे जिल्हा दूध संघ, अमृत हे सहकारी तत्त्वावरील दूघ संघ आहेत. 

दुधातून काय मिळते? 
दुधापासून स्निग्ध पदार्थ, बी कॉम्प्लेक्‍स, एडीईके व्हिटॅमिन, कॅल्शियम असे घटक मिळतात. हे मानवी शरीराला उपयोगी असल्याने दरवर्षी जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने दुधाविषयीची जागरूकता लोकांत निर्माण केली जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 crore liters of milk produced daily in the country