
गडहिंग्लज : बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्याच्या कामात परतीच्या पावसामुळे दोनवेळा खंड पडल्यानंतर आता हिरण्यकेशी नदीत पावसाचे वाहते पाणी अडवण्याचे काम अखंडित सुरू झाले आहे. बंधाऱ्यांमध्ये लोखंडी बरगे टाकण्याचे काम सुरू असले तरी त्यात गती येण्याची गरज आहे. कारण पावसाच्या पाण्याचा नदीपात्रातील प्रवाह कमी होत चालला आहे. दरम्यान, चित्री प्रकल्पासून निलजीपर्यंतच्या गडहिग्लज व आजरा तालुक्यातील सर्व बंधाऱ्यामध्ये दरवर्षी साधारण 590 एमसीएफटी इतके पावसाचे पाणी अडविले जाणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यानंतर नदीमध्ये पाणी अडवण्याची कार्यवाही सुरू होते. त्यातही परतीचा पाऊस कसा आहे, यावर केव्हापासून पाणी अडवायचे याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून होत असते. यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने लघुपाटबंधारे तलावांसह मध्यम प्रकल्पही तुडुंब झाले. त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोंबरमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. मध्यंतरी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर नदीपात्रातील पाणी कमी झाले. यामुळे पाटबंधारे विभागाकडून बरगे घालण्याचे नियोजन सुरू झाले. निलजी बंधाऱ्यापासून त्याची सुरवातही करण्यात आली, परंतु काही दरवाजांमध्ये बरगे टाकल्यानंतर पुन्हा पाऊस कोसळला. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. यामुळे या कामात खंड पडला.
दरम्यान, गेल्या पाच-सहा दिवसांपासून वातावरण कोरडे आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असले तरी पाऊस पडत नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने पुन्हा बरगे घालण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पहिल्यांदा निलजी बंधाऱ्यात काही फुटापर्यंत बरगे घालण्यात येतात. त्यानंतर खणदाळ आणि हरळी, गिजवणे, जरळी, ऐनापूर, गजरगाव, भादवण या बंधाऱ्यांमध्ये बरगे घालून पाणी अडविले जाते. अद्याप ओढ्यांमधून पाणी वाहत आहे. नदीचा मुख्य प्रवाहही बऱ्यापैकी आहे. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पात्रातील प्रवाह अतिशय कमी झाला आहे. ओढ्याचे प्रवाहही कमी होत आहेत. परिणामी बरगे घालण्याच्या कामाला गती दिली नाही, तर अपेक्षित पाणीसाठा होतो की नाही, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे.
जानेवारी अखेरपर्यंत दिलासा
चित्री प्रकल्पासून निलजीपर्यंतच्या गडहिग्लज व आजरा तालुक्यातील सर्व बंधाऱ्यामध्ये दरवर्षी साधारण 590 एमसीएफटी इतके पावसाचे पाणी अडविले जाते. हे पाणी जानेवारी अखेरपर्यंत पुरणे अपेक्षित असते. त्यानंतर चित्री प्रकल्पातील आवर्तन सुरू केले जाते. गतवर्षी अपेक्षित साठा झाला. यंदाही तो करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांना गती मिळाल्यास नियोजन यशस्वी होण्यात अडचण येणार नाही.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.