शिंगणापुरातील 72 कुटुंबे अजूनही महापुराच्या भरपाईपासून लांबच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

गतवर्षी आलेल्या महापुरात लाखो हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले, सर्वांचे पंचनामे झाले. काही ठिकाणी नुकसान भरपाई देखील मिळाली.

कोल्हापूर : गतवर्षी आलेल्या महापुरात नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला, हजारो घरांची पडझड झाली, लाखो हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले, सर्वांचे पंचनामे झाले. काही ठिकाणी नुकसान भरपाई देखील मिळाली. मात्र, अजुनही शिंगणापूर येथील 72 कुटुंबांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. गावातील केवळ 23 कुटुंबांना घराची पडझड झाल्याने प्रत्येकी 95 हजार रुपये मिळाले आहेत. उर्वरीत लोकांना ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरुच आहे. 

आजपर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा महापूर गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवला. आजही या पुराच्या आठवणीने कोल्हापुरकरांना धडकी भरते. महापुराने लोकांनचे अतोनात नुकसान झाले, जनावरे वाहून गेली, शेतातील पिकंही कुजून गेली, घरांची पडझड झाली. महापूर ओसरल्यानंतर पंचनामे करण्यात आले. मात्र, रेड झोनमधील बांधकामे, अतिक्रमण आदीवर चर्चा झाली. त्यामुळे शिंगणापूर येथे अनेक लोकांना नुकसान भरपाई देण्यास मनाई करण्यात आली. पंचनामे झाल्यानंतर पडझड झालेल्या 95 घरांपैकी केळळ 23 कुटुंबांनाच नुकसान भरपाई देण्यात आली. प्रती कुटुंब 95 हजार रुपये शासनाकडून मदत करण्यात आली आहे. 

नियमावर बोट ठेवल्याने अडचण... 
गावातील अजुनही 72 कुटुंबं मदतीपासून वंचित आहेत. नियमाबाहेर जावून मदत न करण्याची भूमिका शासनाने घेतली असल्याने या लोकांना अजुनही मदत मिळालेली नाही. ही मदत मिळावी म्हणून गावात अनेकवेळा आंदोलने करण्यात आली, निवेदने दिली गेली. मात्र आजपर्यंत ही नुकसानभरपाई मिळालेली नाही. आता पुन्हा नव्याने पूर येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे किमान गतवर्षीच्या नुकसानिची भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. 

दृष्टिक्षेप 
- महापुराचा नदीकाठच्या गावांना फटका 
- हजारो घरांचे, पिकांचे नुकसान 
- 23 कुटुंबांना पडझडीचे मिळाले प्रत्येकी 95 हजार 
- नुकसान भरपाईसाठी अनेक आंदोलने 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72 families still far from being compensated