72 वर्षांच्या एसटीला प्रथमच "ब्रेक'

शिवाजी यादव
सोमवार, 1 जून 2020

सर्वसामान्यांना किफायतशीर भाड्यात सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी 1 जून 1948 साली एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा सुरू झाली. एसटी महामंडळाची सेवा उद्या 73 वर्षांत पदापर्ण करीत आहे.

कोल्हापूर : सर्वसामान्यांना किफायतशीर भाड्यात सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी 1 जून 1948 साली एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा सुरू झाली. एसटी महामंडळाची सेवा उद्या 73 वर्षांत पदापर्ण करीत आहे. 36 गाड्यांवरून सुरू झालेला एसटीचा प्रवास आज 18 हजार बसेसचा आहे. दररोज 64 लाख प्रवाशांची वाहतूक करीत या एसटीनेच अनेकांच्या जगण्याला गती दिली आहे. राज्याच्या प्रत्येक संकटकाळात एसटी मदतीला धावली आहे. तिच एसटी आज संकटात असताना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्याची प्रतिक्षा करीत आहे. हे स्वप्न यंदापर्ण होईल का ? अशी अपेक्षा घेऊन एसटी महामंडळ आज वाढदिवस साजरा करीत आहे. 

मुंबई-अहमदनगर मार्गावर एसटीचा पहिली फेरी सुरू झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाडीवस्तीपर्यंत एसटी अबालवृद्धांचा प्रवास घडविणारी जीवन साथी बनली आहे. राज्यभरात 253 आगार आहेत येथून लालापरी, विठाई, निमआराम, शिवशाही, शिवनेरी अशा सर्वसामान्यांपासून ते उच्चवर्गातील प्रवाशांच्या आवडीनुसार आरामदायी तसेच सुरक्षीत प्रवासी सेवा एसटी तर्फे दिली जाते. 

समाजातील विविध घटकांना जवळपास 22 प्रकारच्या सवलती एसटी महामंडळा मार्फत दिल्या जातात. ग्रामीण भागात जेमतेम प्रवासी संख्या असली तरी तिथेही एसटीची सेवा मिळते. अशा एसटीला खासगी वाहतुकीची स्पर्धा निर्माण झाल्याने गेल्या दहा वर्षात एसटीच्या तोटा वाढत आहे. एसटी अर्थिकदृष्ट्या संकटात आली तर गेल्या 72 वर्षाच्या इतिहासात यंदा मात्र कोरोनामुळे एसटीचा प्रवास तब्बल 50 दिवसा पेक्षा अधिक काळ बंद राहीला.

याकाळात एसटीला जवळपास दीड हजार कोटींचा महसुल बुडाला आहे. असे असले तरी कोरोनाच्या संकटात काळात अत्यावश्‍यक सेवेसाठी मुंबईत प्रवासी सेवा दिली तर राज्यभरातील अडकलेल्या दीड लाखांहून अधिक कामगारांना अन्य राज्याच्या सीमेपर्यंत सुरक्षीत प्रवास घडविला तर परराज्यात अडकलेल्या 15 हजार विद्यार्थ्यांनाही एसटीनेच सुरक्षीतपणे घरी आणून सोडले. एसटीचे हे योगदान राज्यासाटी अविस्मरणीय मानले जात आहे. 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी एकरूप असलेली एसटी सध्या अर्थिक संकटात आहे. एसटी महामंडळाच्या रूपाने जवळपास एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला. नव्या काळात एसटीचे सक्षमीकरण व्हावे लागेल त्यासाठी एसटी महामंडळाला राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्याला प्राधान्य द्यावे लागेल. त्यातून एसटी महामंडळ राज्याच्या विकासाला अधिक बळ देऊ शकेल. 
- संदीप शिंदे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72-year-old ST gets 'break' for first time