
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. "जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष अबालवृद्धांच्या मनात स्फूर्तीचे पुल्लिंग चेतवणारा.
चंदगड : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. "जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष अबालवृद्धांच्या मनात स्फूर्तीचे पुल्लिंग चेतवणारा. साडेतीनशे-चारशे वर्षे झाली तरी हा जयघोष आजही तितकाच टवटवीत आहे, याची प्रचिती देणारा प्रसंग आज शिरगाव फाटा (ता. चंदगड) येथे पहायला मिळाला. तेथील पंच्याहत्तर वर्षीय गंगूबाई तुकाराम इंगवले यांनी एका तरुण मंडळाच्या शिवज्योत मिरवणुकीला थांबवून कार्यकर्त्यांचे आलेबले घेतले. शिवज्योत हातात घेऊन त्या काही अंतर धावल्या सुद्धा. केवळ शिवभक्तीच्या अलोट प्रेमातून घडलेला हा प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला.
शिरगाव फाटा येथेच गंगूबाई राहतात. दोन मुलांचे अकाली निधन झाल्याचे दुःख आहेच; परंतु स्वाभिमानी गंगूबाई त्याचे प्रदर्शन मांडत नाहीत. कोणाचे फुकट काही घ्यायचे नाही, हा त्यांचा स्वभाव. स्वतः मोलमजुरी करून मिळवलेल्या पैशातून इतरांना चहा पाजण्याची वृत्ती. प्रल्हाद शिरगावकर यांनी तिला संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन मंजूर करून दिली; परंतु सरकारचे फुकटचे पैसे मला नको म्हणून सुरवातीला त्या कागदपत्रेच द्यायला तयार नव्हत्या.
आजही पेन्शनच्या पैशाची त्यांना आस नसते. त्या राहतात तिथेच प्राचीन भवानी मातेचे मंदिर आहे. गंगूबाईंचे भवानी आई आणि छत्रपती शिवरायांवर अलोट प्रेम, भक्ती. दररोज त्या मंदिराची स्वच्छता करतात. त्या वेळेत "जय भवानी, जय शिवाजी'चा अखंड जयघोष सुरू असतो. त्यांच्या या शिवप्रेमाचे वेगळेच दर्शन आज समाजाला घडले. अडकूर येथील मोरया ग्रुपचे कार्यकर्ते पारगडहून शिवज्योत घेऊन येत होते. आजीच्या घराजवळ ते येताच धावत जाऊनच तिने त्यांना थांबवले.
शिवज्योत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे आलेबले घेतले. शिवज्योत आपल्या हातात घेतली आणि त्या धावू लागल्या. म्हातारपणातही त्यांच्या मनातला सळसळता उत्साह पाहून कार्यकर्त्यांनाही उत्साह आला. शिवरायांच्या जयघोषाने परिसर निनादून गेला.
संपादन - सचिन चराटी
kolhapur